Friday, January 14, 2022

राज्यात ऋतुंचा जांगडगुत्ता...

वेध माझा ऑनलाइन - मागील चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट आणि तिकडून ताशी 4 ते 5 किमी वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा जाणवत आहे. तर दुसरीकडे विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत राज्यात ऋतुंचा जांगडगुत्ता झाल्याचं पाहायला मिळत आहेत. आज सकाळपासून जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.


पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय आज दुपारी अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. ऐन हिवाळ्यात पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आहे. दरम्यान झालेल्या गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांना जबरदस्त फटका बसला आहे. यासोबतच सततच्या ढगाळ हवामानामुळे पीकांवर कीड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळपासून सर्वदूर ढगाळ हवामान आहे. काही भागात सूर्यदर्शन देखील झालं नाही. तर पैठण रोडवरील गेवराई परिसरात सकाळी दहाच्या सुमारास तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. काल रात्री परभणी जिल्ह्यात जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे याठिकाणी सकाळपासून गारवा जाणवत होता. हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अधून मधून रिमझिम अगदी हलक्या सरी कोसळत आहेत. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात देखील सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यानंतर आता अवकाळी पावसाच्या रुपात अस्मानी संकटानं मराठवाड्यातील शेतकऱ्यांच कंबरडं मोडलं आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कांदे आदीसह भाजीपाला या पिकांवर आता पुन्हा एकदा अस्मानी संकट गडद होतं आहे.

No comments:

Post a Comment