Saturday, January 1, 2022

साडे दहा हजार एस टी कर्मचाऱ्यांना रुजू करुन घेण्यास नकार...अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ...!

वेध माझा ऑनलाईन - राज्य शासनात विलीनीकरण्याच्या मागणीसाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप  सुरु आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. अशावेळी साडे दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याबाबतच्या सुनावण्यांना हजर राहिले नाहीत म्हणून 700 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक एसटी कर्मचारी आगारात जात कामावर रुजू करुन घेण्याची विनंती करत आहेत. मात्र, मध्यवर्ती कार्यालयानं याबाबत सूचना केली नसल्याचं सांगत आगारप्रमुखांनी त्यांना रुजू करुन घेण्यास नकार दिलाय.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेत कामावर रुजू होण्याची विनंती वारंवार करण्यात येत आहे. दुसरीकडे आवाहन करुनही हजारो कर्मचारी संपावर ठाम असल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. महामंडळाच्या शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु आहे. तर दोन महिन्यांपासून संप सुरु आहे, राज्य सरकार विलीनीकरणाची मागणी मान्य करत नाही. त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलीय. अशावेळी हे कर्मचारी कामावर रुजू करुन घेण्याची मागणी करत आहेत. मात्र, आता आगारप्रमुखांकडून त्यांना कामावर रुजू करुन घेण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटल्याची चर्चा आता सुरु आहे.

No comments:

Post a Comment