Wednesday, January 5, 2022

राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ; राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा...

वेध माझा ऑनलाईन - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं जाहीर केला होता. 


मुंबईत दिवसागणिक रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत काल तब्बल १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालयं देखील बंद करण्याबाबतची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर आज उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

No comments:

Post a Comment