Tuesday, January 4, 2022

कोरोना संदर्भातील मंत्रालयातील बैठक संपली ; राज्यात लॉकडाऊन लागणार?

वेध माझा ऑनलाईन - मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आता पावलं उचलण्यात येत आहेत. त्याच संदर्भात आज मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात कठोर निर्बंध लावावेत की लॉकडाऊन लावावे या संदर्भात चर्चा झाली.

बैठकीत काय झाली चर्चा?

लॉकडाऊन लावण्याचा निर्णय होणार का? यासाठी सर्वांचेच लक्ष या बैठकीकडे लागलेले होते. पण या बैठकीत लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याची चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता सध्यातरी लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत नाहीये. पण कुठेतरी कठोर निर्बंध लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे.

मिनी लॉकडाऊन?

संपूर्ण राज्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टास्क फोर्सकडून घेतली आहे. तसेच या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. आता बैठकीत झालेल्या चर्चा आणि निर्णयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर आज रात्री नवे निर्बंध लावण्याच्या संदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना येतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत कोरोनाचा उद्रेक

मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाला असून मंगळवारी (4 जानेवारी) नव्या 10 हजार 860 रुग्णांची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. या रुग्णांसह मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे 8 लाख 18 हजार 462 वर. मुंबईत 834 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 4491 वर पोहोचली आहे.

"...तर मुंबईत लॉकडाऊन लागणार"

मुंबईतील कोरोना बाधितांच्या संख्येने 20,000 चा आकडा ओलांडला तर शहरात लॉकडाऊन लावण्याच्या सारखा कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो असं वक्तव्य मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितले की, दररोज नोंद होणाऱ्या कोरोना बाधितांच्या संखयेपैकी 80 टक्के रुग्ण हो ओमायक्रॉन बाधितांचे आहेत.

No comments:

Post a Comment