वेध माझा ऑनलाइन - स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देणार्या आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी कराडसह तालुक्यातील नागरिक एकवटले आहे. कराडमधील भेदा चौकातील जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून कराड नगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
मागील काही वर्षापासून कराडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक करण्यात यावे, यासाठी काही संघटना तसेच दुर्ग संवर्धन क्षेत्रातील मावळ्यांचा आग्रह होता. दोन वर्षापूर्वी कृष्णा नाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारला जावा, यासाठी नागरिकांसह युवकांनी पुढाकारही घेतला होता. मध्यतंरीच्या काळात कोरोनामुळे या विषयावर फारशी चर्चा होऊ शकली नव्हती.
मात्र आता कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका टळला आहे. त्यामुळेच गुरूवारी सकाळी कराडमधील दैत्यनिवारणी मंदिरात नागरिकांची कोरोनाचे नियम पाळून चर्चेसाठी बैठक झाली. या बैठकीत कृष्णा नाक्यावर अपुरा जागेमुळे येणार्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच भेदा चौकातील जागा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासाठी योग्य असून याच जागेची पालिका प्रशासनाकडे मागणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
केवळ कराडमधील नागरिकांचा स्मारक निर्मितीच्या पार्श्वभूमीवर स्थापन केल्या जाणार्या समितीमध्ये समावेश केला जाऊ नये. छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण देशाचे, राज्याचे आराध्य दैवत आहे. त्यामुळेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांचाही या समितीत समावेश असावा, असे मत यावेळी मांडण्यात आले. यावरही सकारात्मक चर्चा होऊन स्मारक समितीत सर्व घटक तसेच सर्व स्तरातील नागरिकांचा समावेश करण्याबाबत एकमत झाले.यावेळी विविध पक्ष, संघटना तसेच समाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपआपली मते व्यक्त केली. या विषयावर कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी चर्चा करून त्यांना याबाबतचे निवेदन देण्याचेही यावेळी सर्वानुमते निश्चित करण्यात आले. तसेच या बैठकीत विविध संघटना, पक्ष, सामाजिक संस्थांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारक व्हावे, यासाठी निवेदन देण्याबाबतचे आवाहनही करण्यात आले.
ना. शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा
दोन दिवसापूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कराडमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी नागरिकांनी ना. एकनाथ शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिले. तसेच मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या उपस्थितीत ना. एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करू, अशी ग्वाही नागरिकांना दिली.
No comments:
Post a Comment