वेध माझा ऑनलाइन - राज्याच्या राजकारणात रोज नवी घडामोड घडताना दिसत आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहेत. तर सत्ताधारी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार खंबीर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं आश्वस्त करण्यात येत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगलेला बघायला मिळतोय. त्यामध्ये आणखी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील संघर्ष बघायला मिळतोय. दुसरीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेदाची आणि महाविकास आघाडीत काँग्रेस मंत्री नाराज असल्याच्या अनेक चर्चा अधूनमधून ऐकू येत असताना भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नवा गौप्यस्फोट करत महाविकास आघाडीची चिंता वाढवली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?
भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील 25 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. "महाविकास आघाडीतील 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. पण थोडीफार मदत करुन सावरले. निवडणुका येऊ द्या, एक-एक भाजपच्या वाघोरीत येऊन पडतील", असं धक्कादायक विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
दरम्यान, दानवे यांना पत्रकारांनी 25 आमदारांपैकी काही आमदारांची नावे विचारली. पण दानवेंनी त्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. "जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे सांगून मला त्यांची आमदारकी धोक्यात आणायची नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर ते प्रवेश करणार आहेत", असं म्हणत दानवेंनी त्या आमदरांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही सांगितला.
रावसाहेब दानवे यांचा हा दावा खरा असो किंवा खोटा, पण त्यांच्या या नव्या दाव्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांची चिंता वाढली आहे. सत्ताधारी पक्षात नेमकं कोण नाराज आमदार आहेत जे भाजपच्या संपर्कात आहे, याची चाचपणी सध्या सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातील आमदार फुटतील का? हा प्रश्न दुरचा असला तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने घेण्यावरुन याच विषयावर चर्चा रंगली होती. त्यावेळी देखील भाजपकडून सत्ताधारी पक्षावर टीका करण्यात आली होती. विधानसभा अध्यक्षाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली तर नाराज आमदार विरोधात मतदान करुन भाजपचा उमेदवार निवडून आणतील, अशी सत्ताधाऱ्यांना भीती आहे, असा दावा भाजपकडून करण्यात आला होता.
No comments:
Post a Comment