Monday, March 7, 2022

नांदगाव (ता. कराड) येथील सेवानिवृत्त शिक्षक वि .तु. सुकरे (गुरुजी) यांचा एस टी संपात सहभागी असणाऱ्याना मदतीचा हात...

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा गेली ४ महिने संप सुरू आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ मिळावेत अशी त्यांची मुख्य मागणी आहे. परिणामी एसटीची चाके जागेवर थांबली आहेत. पण संपात सहभागी कर्मचाऱ्यांवरही वाईट वेळ आली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नांदगाव (ता. कराड) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक वि .तु. सुकरे (गुरुजी) यांनी संपात सहभागी असणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्य देत मदतीचा हात दिला आहे.

एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे. एसटीच्या आजवरच्या इतिहासातील हा सर्वात जास्त दिवस चाललेला संप म्हणून  इतिहासात त्याची नोंद झाली आहे. चार महिन्यांपासून सुरू असलेल्या संपा दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण त्यातून मार्ग निघालेला दिसत नाही. या संपाचा एका बाजूला जनतेला फटका बसत असतानाच संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनाही त्याच्या मोठ्याप्रमाणात झळा बसत आहेत.
गेल्या काही महिन्यात हातात स्टेरिंग धरणारे ,तिकीट देणारे कर्मचारी खुरपे, विळा घेऊन शेतात कामाला जाताना पाहायला मिळत आहेत. उसाच्या फडात ऊस तोडताना कोणी दिसतोय. काहीजण मजुरीला जात आहेत. कोणी भाजीविक्री करतय, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. संपात सहभागी झाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे .
मुळातच मिळणारा पगार कमी , त्यातच संपात सहभागी झाल्याने पगार हातावर मिळत नाही. त्यामुळे दररोजचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, जेवण आधी प्रश्न आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांना भेडसावत आहेत. हीच परिस्थिती लक्षात घेऊन नांदगाव (ता. कराड) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते वि.तु.सुकरे (गुरुजी) यांनी नांदगाव येथील त्यांचे एसटी संपात सहभागी झालेले माजी विद्यार्थी संपत काळे, सतीश पवार, घनश्याम आवळे आदिंना जीवनावश्यक साहित्य देऊन मदतीचा हात दिला आहे.

              सुकरे गुरुजी यांच्या निवासस्थानी कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांना ही मदत देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, वसंत माटेकर, बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते, विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजाराम कांबळे, मोहन कुचेकर, शरद शिनगारे, उदय चौधरी, अभिजीत माटेकर, हितेश सूर्वे, संजय जाधव, रघुनाथ जाधव, सुहास आवळे, अनिकेत जठार, संजय पाटील, अण्णासो पाटील, संदीप पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.

गुरुजींचे भावनिक पत्र

 आंदोलनात सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्यांना वि. तु .सुकरे गुरुजी यांनी जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून देतानाच एक भावनिक पत्रही त्यांना दिले आहे. त्यात तुम्ही संपात सहभागी असल्याने तुमच्या कुटुंबाची काय परवड झाली असेल याची चिंता वाटते म्हणूनच ही मदत करीत असल्याचे नमूद केले आहे. तसेच हा संप लवकरात लवकर मिटावा, एस टी पुन्हा रस्त्यावर नव्या जोमाने धावावी व तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 
 

No comments:

Post a Comment