वेध माझा ऑनलाइन - माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काही यूट्यूब चॅनलवर मोठी कारवाई केली आहे. खोट्या बातम्या आणि भारतविरोधी कंटेंट पोस्ट केल्याबद्दल मंत्रालयाने 18 भारतीय आणि चार पाकिस्तान आधारित YouTube चॅनल ब्लॉक केले आहेत. या यूट्यूब चॅनलने लोकांची दिशाभूल करण्यासाठी टीव्ही चॅनलचे लोगो आणि खोट्या थंबनेलचा वापर केला होता, अशी माहिती आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या यूट्यूब चॅनलचा वापर भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर सारख्या विविध विषयांवर तसंच पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या अनेक सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे एकत्रित केलेला भारतविरोधी कंटेंट पोस्ट करण्यासाठी केला जात होता. तसंच पाकिस्तानमधून भारताविरोधात फेक बातम्याही पसरवल्या जात होत्या.
त्याशिवाय या ब्लॉक केलेल्या यूट्यूब चॅनलवर सध्याच्या युक्रेनमधील स्थितीचा फेक कंटेंट पोस्ट केल्याचंही सांगण्यात आलं आहे. इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध धोक्यात आणण्याचा यामागचा उद्देश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या यूट्यूब चॅनलवर मोठ्या प्रमाणात व्ह्यूवर्स होते. Viewers ची संख्या जवळपास 260 कोटींहून अधिक होती.
2021 डिसेंबर ते आतापर्यंत मंत्रालयाकडून एकूण 78 यूट्यूब चॅनल ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याशिवाय सोशल मीडिया अकाउंट्सदेखील बॅन केले आहेत, ज्याद्वारे चुकीची, फेक माहिती पोहोचवली जात होती.
दरम्यान, WhatsApp ने यावर्षी फेब्रुवारीदरम्यान 14.26 लाख भारतीय अकाउंट बंद केले आहेत. अनेक तक्रारींनंतर WhatsApp ने हे पाऊल उचललं आहे. युजर्सकडून आलेल्या तक्रारी आणि त्यावर केलेल्या कारवाईसह या प्लॅटफॉर्मचा दुरोपयोग रोखण्यासाठी WhatsApp ने ही कारवाई केल्याचं सांगितलं आहे.
No comments:
Post a Comment