Saturday, September 10, 2022

सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्री चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसले ; हे संकेतांना धरून नाही ; काँग्रेस राष्ट्रवादीचा आक्षेप...

वेध माझा ऑनलाइन - सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा काल मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांवर कौतुकाचा वर्षाव केला होता. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आला आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


काय म्हणाले जयंत पाटील 
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची गंभीर सुनावणी सुरु आहे, असे असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे याबाबतचा आक्षेप जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

काय म्हणाले सचिन सावंत 
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, शिंदे फडणवीस सरकारची वैधता आणि कायदेशीरता स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे तपासली जात असताना आणि केवळ सध्याचे राज्य सरकारच नाही तर राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला देखील अपात्र ठरवले जाऊ शकते अशी परिस्थिती असताना व्यासपीठावरील विसंगती उठून दिसणे साहजिकच आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री शिंदेकडून सरन्यायधीशांवर कौतुकाचा वर्षाव...
महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कलह मिटविण्याची इच्छा प्रकट करणाऱ्या लळीतांचे नाव धारण करणाऱ्या उदयजी लळीत आज न्यायदानाच्या सर्वोच्च पदावर पोहचले हा विलक्षण योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.




No comments:

Post a Comment