वेध माझा ऑनलाइन - कुणबी दाखला देण्यासाठी 50 हजार रूपयांची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकास अटक केल्यानंतर यापूर्वी देण्यात आलेल्या कुणबी दाखल्यांचा विषय चर्चेत आला आहे. आजपर्यंत दिल्या गेलेल्या दाखल्यांची चौकशी करावी व यातील दोषींवर कारवाई करावी, अन्यथा सर्व शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशारा विविध शेतकरी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी व नोकरीसाठी सवलत मिळावी यासाठी शेतकरी कुणबी दाखला घेत असतो. लाखों रूपयांची फी भरून शिक्षण घेणे शेतकन्यांच्या मुलांना शक्य होत नाही. अशातच जर असे दाखले देताना शेतकऱ्यांकडे हजारो रूपयांची मागणी होत असेल तर हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. आम्ही तो सहन करणार नाही. त्यामुळे कुणबी दाखले वितरणाची चौकशी व्हावी. शेतकऱ्यांना कुणबी दाखले देताना त्यामध्ये पारदर्शकता ठेवावी. कुणबी दाखल्यांसाठी येणारा खर्च कार्यालयाच्या बाहेर लावण्यात यावा. कुणबी दाखले व लाच प्रकरणाची सखोर चौकशी झाली नाही तर सर्व शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रयत शेतकरी संघटनेचे प. महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, शेतकरी संघटनेचे नेते अनिलबापू घराळ, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, योगेश झांत्रे, अविनाश जाधव, आनंदराव चव्हाण यांच्यासह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment