Tuesday, January 17, 2023

कराडच्या पाणी प्रश्नासाठी तीव्र जन आंदोलन उभारणार - ऋतुराज मोरे


वेध माझा ऑनलाइन - 
कराड शहरासाठी उपयुक्त असणारी 24 तास पाणी पुरवठा योजना गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे, पूर्णतः कार्यान्वित झालेली नाही. तसेच काही महिन्यापासून 24 तास पाणी योजना सुरु असल्याचे सांगून प्रत्यक्षात शहराला पूर्वी सारखाच 2 वेळा पाणी पुरवठा केला जात आहे व तरीही वार्षिक बिल न आकारता 24 तास पाणी योजनेचे बिल आकारले जात आहे. हे शहरातील नागरिकांसाठी अन्यायकारक बाब असल्याने कराड शहर काँग्रेस कमिटी या महत्वाच्या पाणी प्रश्नावर मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा देत आहे कि 24 तास पाणी योजनेची अनियमितता तात्काळ दुरुस्त करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी दिला. आज त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे निवेदन मुख्याधिकारी रमाकांत डाके उपस्थित नसल्याने उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांना देण्यात आले.
यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, सातारा जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग झाकीर पठाण, नगरसेवक फारुक पटवेकर, माजी नगरसेवक अशोक पाटील, प्रदीप जाधव श्रीकांत मुळे सामाजिक कार्यकर्ते विजय मुठेकर अमीर कटापुरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी कराड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऋतुराज मोरे म्हणाले, कराड शहराची 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना म्हणजे मोठे गौडबंगाल आहे. गेली कित्येक वर्षे कराड शहराला रोज 24 तास पाणी पुरवठा चालू होईल म्हणून कराडकर नागरिक वाट पाहत आहेत. परंतु कराड नगरपालिकेच्या ढिसाळ व अनागोंदी कारभारामुळे आजतागायत कराडकर नागरिकांना रोजचा 24 तास पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. कराड नगरपालिका प्रशासनाने 1 एप्रिल 2022 पासून 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून मीटर प्रमाणे आकारणी चालू केली. परंतु प्रत्यक्षात शहरात  रोज दोनदा च पाणीपुरवठा केला जात आहे व आकारली जाणारी बिले हि कराडकरांना न परवडणारी आहेत. तसेच पाणी पुरवठा सुरु होण्याच्या आधी व नंतर हवेच्या प्रेशर ने मीटर फिरते असे निदर्शनास येते व त्याची सुद्धा आकारणी कराडकरांकडून केली जात आहे हे अत्यंत अन्यायकारक आहे. अशा अनागोंदी कारभारामध्ये तात्काळ सुधारणा व्हावी तसेच जोपर्यंत 24 तास पाणीपुरवठा योजना पूर्णपणे कार्यान्वित होत नाही तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच वार्षिक बिल आकारणी व्हावी अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.

No comments:

Post a Comment