वेध माझा ऑनलाइन - राज्यातील बेरोजगार आणि ग्रामीण भागातील तरुण तरुणींसाठी शिंदे- फडणवीस सरकारनं सर्वात मोठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात पोलीस भरती, तलाठी भरतीनंतर आता तब्बल 40 हजार पदांची भरती होणार आहे. महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच 40 हजार पदांची भरती होणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि ‘अ’ वर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद- पंचायतीमध्ये ५५ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त असून त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
संचालनालयामार्फत व नगरपरिषद-नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट ‘क’ आणि गट ‘ड’ मध्ये 3720 पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 8490 पदांची भरती प्रक्रिया सुरु केली असून या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करुन मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषयक बाबी पूर्ण करुन भरती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. महापालिका, नगरपरिषदांच्या शाळा आणि रुग्णालयांना आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांनी भेटी देऊन स्वच्छतेवर भर द्या, ज्येष्ठ नाग़रिक आणि गर्भवती महिलांना एकाच ठिकाणी सर्व वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment