वेध माझा ऑनलाईन । महावितरणचे विद्यमान अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात 54 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिल काढली आहेत. तसेच त्यांच्या संगनमताने सर्व विभागीय अधिकाऱ्यांनीही मोठी टक्केवारी घेऊन जास्तीची बिले काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे. संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा, येत्या ५ जूनपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव पिसाळ व रुपेश मुळे यांनी दिला.
कराडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी महेश डांगे, ऋषिकेश पिसाळ यांची उपस्थिती होती. ते म्हणाले, सातारा महावितरणचे विद्यमान अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकाळात 54 कोटी पेक्षा जास्त बिले काढली आहेत. या बिलामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांच्या संगनमताने जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेऊन जास्तीची बिले काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे.या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवांनी बारामती उच्चदाब वितरण प्रणाली विभागाचे मुख्य अभियंता प्रकाशगड यांना सदर प्रकरण तपासून चौकशी करून सत्यता पडताळावी व त्या अनुषंगाने अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. परंतु, प्रकाशगड यांनी कोणतीही चौकशी केली नाही व कोणताही अहवाल पाठवला नाही.
मे. विक्रान इंजीनियरिंग अँड एक्झिम प्रा.लि.ठाणे या कंपनीला १८० कोटी रुपयांचे सातारा जिल्ह्यातील शेतीपंपाची नवीन विज जोडणी कनेक्शनचे टेंडर मंजूर केले आहे. या टेंडरची मूळ किंमत १८० कोटी रुपये असले तरी त्याचे अंतिम टेंडर किंमत 130 कोटी इतकी आहे. या कंपनीला 2018 सालामध्ये टेंडर मिळाले होते. आत्तापर्यंत या कंपनीला या कामाच्या बिलापोटी ११० कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे. या कंपनीने जिल्ह्यात केलेल्या कामांची माहिती व बिले महावितरणकडून मिळवली असता जिल्ह्यातील विविध विभागात वेगवेगळ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाला असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही न्यायालयीन व रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज झालो आहोत. जिल्ह्यात झालेल्या या कामांची पाहणी केली असता कोण-कोणत्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. याचा लेखाजोखा यावेळी हिंदुराव पिसाळ व रुपेश मुळे यांनी मांडला.
ते म्हणाले, डीपीला एक लाख रुपये खर्च येतो. प्रत्यक्षात साइटवर तेवढे मटेरियल नाही. तसेच कमी मटेरियल वापरून प्रत्येक पोलमागे संबंधित अधिकाऱ्यांनी हजारो रुपये खाल्ले आहेत. मीटर बॉक्सला लागणारी केबल ही पाच हजार कनेक्शन नुसार 50 हजार मीटर केबल वापरणे आवश्यक आहे.प्रत्यक्षात ३०हजार मीटर सुद्धा केबल साइटवर दिसत नाही. जिल्ह्यातील काही भागात मेन लाईन व डीपी बसवला आहे आणि त्याची बिले काढून नंतर ती पूर्ण लाईन व पोल काढून नेण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंट पोल उभे करून बिलामध्ये लोखंडी पोलची बिले काढली आहेत. जिल्ह्यात पाच हजार कनेक्शन मागे दोन हजार एबी स्विच लावणे बंधनकारक आहे त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी केली असता 1 हजार एबी स्वीट पण साइटवर नाहीत त्याची अंदाजे दीड कोटी रुपयांची बोगस बिले महावितरण ने संबंधित ठेकेदाराला टक्केवारी घेऊन दिली आहेत. साइटवर मीटर बॉक्स निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. या सर्व बाबी माहिती अधिकारातून व प्रत्यक्ष साइटवर भेट दिल्यानंतर कोट्यावधी रुपयांचा यामागे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहेत. मे विक्रान इंजीनियरिंग अँड एक्झिम प्रा. लि. ठाणे या कंपनीने सातारा जिल्ह्यात केलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला आहे. या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकावे तसेच जिल्ह्यातील सर्व कनेक्शनची सखोल चौकशी करून संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा येत्या ५ जून रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा हिंदुराव पिसाळ व रुपेश मुळे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला.
No comments:
Post a Comment