वेध माझा ऑनलाइन। कराड तालुक्यात सध्या बिबट्यांकडून रात्रीच्यावेळी मानवीवस्तीत प्रवेश केला जात आहे. कराड तालुक्यातील विजयनगर येथे डोंगरावर सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास चक्क तीन बिबटे वावरताना दिसून आले. यानंतर गावात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळतच वन विभागाचे पथक गावात दाखल झाले असून बिबट्यांचा शोध घेतला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-पाटण मार्गावर कराड पासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर विजयनगर हे गाव आहे. या गावातील प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयाच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी रात्री 9 च्या सुमारास काही युवक थांबले होते. विद्यालयाचे कर्मचारी संतोष माने हेही त्याठिकाणी होते. त्यावेळी युवकांपासून केवळ 6 ते 7 फूट अंतरावरून 3 बिबटे एकापाठोपाठ गेल्याचे युवकांना दिसले.
बिबट्यांना पाहताच युवकांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबटे गावातील महाकाली दूध संघाच्या परिसराकडे गेले. त्यानंतर युवकांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यामुळे संपूर्ण गाव त्याठिकाणी जमा झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे पथकही तातडीने गावात दाखल झाले आहे. गावासह परिसरात संबंधित बिबट्यांचा वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेतला जात होता.
No comments:
Post a Comment