Monday, January 8, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाला ? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालपत्राचा मसुदा दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याची माहिती ;

वेध माझा ऑनलाइन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचं समजतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 10 जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य आहे. 

सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 10 जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष 10 जानेवारीपर्यंत वाट न पाहाता, आज किंवा उद्यापर्यंतच निकाल जाहीर करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 'लोकसत्ता'नं दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार असून विधानसभा अध्यक्षांनी ही निकालाचा मसुदा दिल्लीला कायदेशीर अभिप्रायासाठी तज्ज्ञांकडे पाठवला आहे. 

अध्यक्षांचा निकाल काय? निवडणूक आयोगाप्रमाणेच शिंदेंनाच झुकतं माप? याबाबत जर स्पष्टीकरण द्यायचं झालं तर, निवडणूक आयोगानं ज्या ट्रिपल टेस्टच्या आधारावर शिंदेंना झुकतं माप देत पक्ष आणि चिन्ह बहाल केलं, त्याचाच जर आधार विधानसभा अध्यक्षांनी घेतला, तर निकाल काय असू शकतो, याचा अंदाज आपल्या सर्वांना लावता येईलच. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांना याबाबत निर्णय घ्यायचा आहे. ज्यावेळी शिवसेनेत फूट पडली त्यावेळी राजकीय पक्ष कोणाचा होता? जर त्यादिवशी राजकीय पक्ष एकनाथ शिंदेंचा होता, तर मग राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष अशी जी विभागणी सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात केली आहे, त्याचा नेमका अर्थ काय? याचा सारासार विचार करुन अन्वयार्थ लावणारा हा देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक निवाडा असणार आहे. विधानसभा अध्यक्षांनीही स्वतः अनेकदा हा निवाडा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. 

दरम्यान, पुढच्या दोनच दिवसांत हे स्पष्ट होणार आहे की, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.

No comments:

Post a Comment