भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी अंतरवली सराटीत जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. त्यांच्यासह शिवसेनेचे खासदार संदीपान भुमेरही होते. अंतरवलीतल्या सरपंचांच्या घरी ही भेट झाली. यावेळी अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यात दोन तास चर्चा झाली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी लढा उभा केला आहे. मनोज जरांगेंनी जून महिन्यात उपोषणही सुरु केलं होतं. मात्र त्यावेळी शंभूराज देसाई यांनी त्यांची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. आता मनोज जरांगेंनी सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
मनोज जरांगेंनी काय म्हटलं आहे?
अशोक चव्हाण हे सरकार, समाज किंवा माध्यम म्हणून आले आहेत का? हा विषय महत्त्वाचा नाही. त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरु राहिल. बाकी आमच्या मागण्यांबाबत आम्ही पाठपुरावा सुरुच ठेवणार आहोत. सगेसोयऱ्यांच्या आमच्या व्याख्येप्रमाणे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. हैदराबाद गॅजेटचा संदर्भ घेण्यात यावा. तसंच मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी चर्चा झाली आहे असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं.
No comments:
Post a Comment