वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत राजकारणामध्ये एकत्र येण्यासाठी काहीच अडचण नसल्याचे वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आता दुभंगलेली शिवसेना यांच्यामध्ये युतीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात जी चर्चा गेल्या 18 वर्षांपासून होत आहे, त्या चर्चेनं पुन्हा एकदा जोर पकडला होता. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांनी जाहीर मुलाखतीमध्ये संकेत दिल्यानंतर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तेव्हापासून दोनवेळा याबाबत जाहीरपणे भाष्य केलं आणि नुकत्याच दिलेल्या एका वक्तव्यामध्ये ते म्हणाले की, आता थेट बातमीच देऊ. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी सुद्धा सुरू होती. त्यामुळे कुठेतरी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याला सुरुवात झाली आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र, ही चर्चा सुरू असतानाच आज एक वेगळीच राजकीय घडामोड मुंबईमध्ये घडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (12 जून) राज ठाकरे यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेत तब्बल एक तास चर्चा केली. या चर्चेचा तपशील समोर आला नसला, तरी आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका आणि संभाव्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असावी, असा राजकीय अंदाज लावला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यापासून फारकत घेत महायुतीशी जुळवून घेणार की हे सर्व बाजूला सारून उद्धव ठाकरे यांच्यासोबत जुळवून घेणार? याबाबत तर्कवितर्क पुन्हा लावले जात आहेत.
No comments:
Post a Comment