Tuesday, July 8, 2025

डॉ. सुरेश भोसले यांना शिक्षण मंडळ, कराडचा कै. डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती पुरस्कार जाहीर ;

वेध माझा ऑनलाईन।
शिक्षण, सहकार, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांना शिक्षण मंडळ, कराडतर्फे यंदाचा कै. डॉ. रा. भा. देवस्थळी स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरुवार (दि. 10) जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल), कराड येथे होणाऱ्या ‘गुरुगौरव’ समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा समूहाने प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय, नर्सिंग, औषध निर्माण, कृषी व पशुवैद्यकीय शिक्षणसंस्था उभारून ज्ञानप्रसारात महत्त्वाचे योगदान दिले आहे. करोना काळात त्यांनी शेकडो रुग्णांवर मोफत उपचार करून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जपली. कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा बँक, कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सहकार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.

या गौरवसमारंभात अन्य नामांकित व्यक्ती आणि संस्था यांचाही सन्मान केला जाणार असून, खालील पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले आहेत:
विद्यारत्न पुरस्कार : रयत शिक्षण संस्था, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय (स्वायत्त) कराड, साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार : प्रमोद संकपाळ, कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह कराड, आदर्श शिक्षिका पुरस्कार : डॉ. स्नेहल मकरंद राजहंस, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, आदर्श निवृत्त मुख्याध्यापक पुरस्कार : सुषमा इंदुलकर, पी.के. सावंत माध्यमिक विद्यालय, अडरे (चिपळूण), आदर्श प्राचार्य पुरस्कार : डॉ. सतीश भिसे, निवृत्त प्राचार्य, औषध निर्माण महाविद्यालय कराड, उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार : प्रकाश पागनीस, प्रवचनकार व रंगकर्मी पुणे, उत्तम शिक्षक पुरस्कार : उदय कुंभार, टिळक हायस्कूल कराड,
उत्तम शिक्षक (प्राथमिक विभाग) पुरस्कार : ज्योती ननवरे, टिळक हायस्कूल कराड, उत्तम सेवक पुरस्कार : शारदा चव्हाण, शिक्षण मंडळ इंग्रजी माध्यम शाळा कराड, आदर्श विद्यार्थी पुरस्कार : सानिका रामचंद्र गरूड, टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कराड, सेवाव्रती पुरस्कार : अशोक रंगराव पवार, निवृत्त अभियंता, कराड नगरपरिषद, विज्ञान शिक्षक पुरस्कार : जीवन थोरात, विज्ञान शिक्षक, टिळक हायस्कूल कराड यांना जाहीर झाला आहे.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कुलपती डॉ. सुरेश भोसले उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल हुद्देदार, चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे आणि सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment