स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालकमंत्री म्हणून स्वच्छतेबाबत आढावा घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कराड, पाचगणी नगरपालिका पारितोषिक मिळवत असतील तर अन्य नगरपालिकांनीही काम केले पाहिजे. याबाबत जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. लवकरच ग्रामीण भागासाठी गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांची कार्यशाळा घेऊन स्वच्छतेबाबत धडक मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचा राज्यस्तरीय स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार देवदास मुळे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ अतुलबाबा भोसले, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, रणजीत पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी तसेच कराड शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
जिल्ह्यात स्वच्छतेबाबत प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. सातारा नगरपालिकेने स्वच्छता मार्शल नेमले आहेत. देवदास मुळे यांनी सातत्याने स्वच्छतेविषयी लिखाण करून जनजागृती केली. त्याची दखल शासनाने घेतली आहे, असे नामदार देसाई म्हणाले.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले की, कराडच्या पत्रकारितेला वेगळी उंची आहे. देवदास मुळे यांनी आतापर्यंत जपलेला बंधुभाव आणि समाजाप्रती प्रेम यापुढेही कायम ठेवावे. कराड दक्षिणचे लोकप्रतिनिधी म्हणून पत्रकार भवन आणि पत्रकार कॉलनी उभारणे या कामांना आपले प्राधान्य असणार आहे. नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करावेत, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
देवदास मुळे यांनी सत्काराला उत्तर देताना स्वच्छतेचा आग्रह धरणारी पत्रकारिता यापुढेही करण्याची ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण व स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानाची माहिती दिली.
यावेळी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोरख तावरे, सतीश मोरे, सचिन देशमुख, शशिकांत पाटील, सचिन शिंदे, हेमंत पवार, अजय जाधव, संभाजी थोरात, विकास भोसले, खंडू इंगळे, नितीन ढापरे, अकबर शेख, दिनकर थोरात यासह कराड शहर व तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
प्रमोद तोडकर यांनी सूत्रसंचालन केले. अभयकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. विशाल पाटील, सुलतान फकीर, सुरेश डुबल, कैलास थोरवडे यांनी स्वागत केले. संदीप चेणगे यांनी मानपत्र वाचन केले. अशोक मोहने यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment