Monday, August 18, 2025

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशी टाळून बोगस मतदारांना पाठीशी घातले ;माझे आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा डाव ; उपोषणकर्ते गणेश पवार यांचा गंभीर आरोप ;

वेध माझा ऑनलाइन।
विधानसभा निवडणुकीत कापिल व गोळेश्वर येथे बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते गणेश पवार यांनी केला आहे. या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशी टाळून बोगस मतदारांना पाठीशी घातल्याचा ठपका यावेळी गणेश पवार यांनी  ठेवला आहे.दरम्यान माझे हे आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा डाव दिसत आहे. आपला ‌‘जीव गेला तरी मागे हटणार नाही. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण आम्ही ठाम आहोत,‌’ असे गणेश पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.दरम्यान या बोगस मतांच्या भानगडीची चर्चा आता राज्यभर होऊ लागली आहे

14 ऑगस्टपासून येथील प्रशासकीय कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाचा आज (सोमवारी) पाचवा दिवस असूनही निवडणूक निर्णय अधिकारी चर्चेसाठी न आल्याने गणेश पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी उपोषणस्थळी पत्रकार परिषद घेऊन गणेश पवार यांनी बोगस मतदारांचे पुरावे सादर केले.
पवार यांच्या मते, मतदार नोंदणी प्रक्रियेत केवळ आधारकार्डावरून नावे समाविष्ट करण्यात आली असून, काहींची रेशनकार्डे परजिल्ह्यातील असताना जोडलेली वीजबिले मात्र इतरांची असल्याचे उघड झाले आहे. मूळ गावातील यादीत नावे कायम असतानाही विधानसभा यादीत पुन्हा तीच नावे समाविष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रक्रियेत कापिल येथील 9 व गोळेश्वर येथील तब्बल 75 असे एकूण 84 बोगस मतदार आढळल्याचा दावा त्यांनी केला.
‌‘ग्रामपंचायत व लोकसभा यादीत नावे नसताना अवघ्या चार महिन्यांत विधानसभा यादीत नावे कशी आली?‌’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. माहिती अधिकाराखाली कागदपत्रे मागितल्यावर केवळ आधारकार्ड वगळता इतर कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‌‘बोगस कागदपत्रांवर मतदार नोंदणी करून निवडणूक विभागाची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारांवर गुन्हा दाखल व्हावा व पारदर्शकता न ठेवणाऱ्या निर्णय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई व्हावी,‌’ अशी ठाम मागणी पवार यांनी केली.
गेल्या पाच दिवसापासून आपले उपोषण सुरू आहे. परंतु यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे काम केले आहे का? तसे नसेल तर ते ठोस पुरावे का सादर करीत नाहीत. निवडणूक निर्णय अधिकारी आंदोलन स्थळी भेट न देता आपणाला त्यांच्या दालनात चर्चेसाठी बोलावून घेत आहेत. यावरून हे आंदोलन दडपण्याचा प्रशासनाचा डाव दिसत आहे. आपला ‌‘जीव गेला तरी मागे हटणार नाही. आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण आम्ही ठाम आहोत,‌’ असे गणेश पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment