आधार कार्ड अपडेशन केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे कराड तालुक्यात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आधार अपडेटेशन केंद्रांची संख्या ताबडतोब वाढविण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. याबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करत, येत्या आठवड्याभरात कराड तालुक्यात १३ ठिकाणी नवीन आधार अपडेटेशन केंद्र सुरू करण्याची ग्वाही प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली आहे.
विविध शासकीय योजना, शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया, तसेच बँकिंग व्यवहारांमध्ये आधार कार्ड ही अत्यावश्यक बाब बनली आहे. आधार कार्डचे अपडेशन करण्याबाबत सर्वत्र कार्यवाही सुरु आहे. मात्र अपुऱ्या आधार अपडेटेशन केंद्रांमुळे नागरिकांना सध्या प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्रांची अपुरी संख्या, सर्व्हर डाऊन यासारख्या अडचणींमुळे अशा केंद्रांसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत आहे. तसेच हेलपाट्यांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाया जात आहे.
नागरिकांचा हा त्रास कमी व्हावा, यासाठी तालुक्यात आधार अपडेशन केंद्रांची संख्या तातडीने वाढविण्याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याशी चर्चा करुन, याबाबतच्या सूचना केल्या होत्या. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत, येत्या आठवड्याभरात तालुक्यात १३ ठिकाणी नवीन आधार अपडेटेशन केंद्र सुरू करण्याची ग्वाही प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली आहे.
नवीन केंद्रे सुरू झाल्याने नागरिकांना जवळच्या ठिकाणी आधार दुरुस्ती किंवा अपडेट करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे रांगा कमी होतील, तसेच नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.
आ डॉ अतुलबाबांची प्रतिक्रिया...
आधार अपडेटेशनसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी मी प्रशासनाशी सातत्याने संवाद साधत आहे. प्रशासनाने तत्काळ सकारात्मक पाऊल उचलल्याने येत्या आठवड्याभरात कराड तालुक्यात १३ नवीन आधार अपडेशन केंद्रे सुरु होतील. ज्यामुळे तालुक्यातील नागरिकांना सुलभ सेवा मिळू शकेल.
No comments:
Post a Comment