वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले आहे. या पदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. अशातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याआधी उद्या दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यानंतर सायंकाळी शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्रीपदासह सुनेत्रा पवार यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत होती. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा केली होती, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे. त्या सोबतच अजित पवारांकडे असलेले राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार आपल्याकडेच ठेवणार असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता त्या अजित पवारांप्रमाणे दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहेत.
No comments:
Post a Comment