Tuesday, January 11, 2022

अर्थपूर्ण शब्दातून व्यक्त होणारा लेखक म्हणजे पत्रकार - खा श्रीनिवास पाटील...लायन्स क्लबने केला कराडच्या पत्रकारांचा सत्कार...

वेध माझा ऑनलाइन 
कराड
लपवले दाखवले आणि झाकले या तीन वेगळ्या पण महत्वाच्या क्रिया आहेत याचा अनुरूप अर्थ समजून घेत त्या क्रिया योग्य वेळी आपल्या लिखाणातून सार्थ करणारा लेखक म्हणजे पत्रकार असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज येथे व्यक्त केले आणि या कलेने अवगत असणारा पत्रकार घडवण्याची ताकद कृष्णाकाठी आहे जमेल तेवढे लोकांसाठी काम करा...मोठे व्हा...असे सांगत  खा श्रीनिवास पाटील यांनी आज पत्रकारांशी मोकळ्या गप्पाही मारल्या...

कराड लायन्स क्लबच्या वतीने येथील अर्बन शताब्दी हॉल येथे पत्रकाराचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते
यावेळी लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल भोजराज निंबाळकर, लायन्स क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष खंडू इंगळे सचिव संजय पवार,  खजिनदार मिलिंद भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. पाटील म्हणाले,पत्रकारांनी मनापासून केलेले काम टिकते आणि तळमळीने केलेल्या कामाची कोणत्याही माध्यमातून त्यांना नक्कीच पोच मिळते  पत्रकारांनी कुटुंबीयांनाही वेळ देणे  महत्त्वाचे आहे. 
भोजराज निंबाळकर म्हणाले, मानवाने स्वतःहून अनेक नैसर्गिक संकटे ओढवून घेतली आहेत या आपत्तींमागे ग्लोबल वॉर्मिंग हे महत्त्वाचे कारण आहे. ही परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब, जिल्हा सहकारी बँक आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने 20 फेब्रुवारी 2022 रोजी एक वेबिनार आयोजित केले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि कृषी खात्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासह लायन्स क्लबच्यावतीने वेळोवेळी करण्यात येत असलेली सर्व सेवाकार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात. त्यामुळे त्यांच्या कृतज्ञतेप्रती लायन्स क्लबच्या माध्यमातून दरवर्षी पत्रकारांचा गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 अध्यक्ष खंडू इंगळे म्हणाले, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात वृत्तपत्राची गरज भासल्याने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे त्यांचा जन्मदिनी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील पत्रकारीतेत काळानुरूप बदल होत गेला. सध्या, डिजिटल पत्रकारितेचे युग आले आहे. या डिजिटल माध्यमांकडे शासनही संवेदनशील दृष्टीने पाहात असून डिजिटल पत्रकारीतेनेही एकप्रकारची क्रांती घडवली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 दरम्यान, उपस्थित पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच लायन्स क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष पत्रकार खंडू इंगळे यांचा मान्यवरांसह क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कराड, मलकापूरसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन ला.  राजीव शहा यांनी केले. तर आभार ला. संदीप पवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment