वेध माझा ऑनलाइन - महान गायिका लता मंगशकर यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लतादीदींवर संध्याकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत
लता मंगेशकर यांचं पार्थिव मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून सकाळी 11 ते दुपारी 2:30 या वेळेत घरी आणलं जाईल, जिथे अनेक दिग्गज व्यक्ती दिवंगत लता मंगेशकर यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करतील. प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी 6 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंतिम संस्कारापूर्वी लतादीदींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे नेण्यात येणार आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. 2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन भारत सरकारने लता मंगेशकर यांचा गौरव केला. त्यापूर्वी त्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या होत्या. याखेरीज फ्रेंच आणि ब्रिटीश सरकारचे सर्वोच्च नागरी सन्मानही लता मंगेशकर यांना मिळाले.लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अगदी काही दिवसांपूर्वी त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी बातमी आली होती. त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढला होता. पण शनिवारी (5 फेब्रुवारी) त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. डॉ. प्रतीत सामदानी यांची टीम त्यांच्यावर ICU मध्ये उपचार करत होती. मात्र, उपचारादरम्यानच आज सकाळी त्यांचं निधन झालं.
No comments:
Post a Comment