वेध माझा ऑनलाइन - नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कुख्यात गँगस्टार आणि ड्रग्ज तस्कर आबू खान प्रकरणी चौकशीसाठी बोलावलेल्या काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला आहे. लतीफ शेख असं या काँग्रेस पदाधिकाऱ्याचं नाव आहे. लतीफ शेख यांनी आबू खानला तो फरार असताना एक लाख रुपयांची मदत केली होती, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पण पोलिसांच्या चौकशीनंतर घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळी लतीफ शेख यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं.
नागपूर पोलिसांनी गेल्या आठवड्यात कुख्यात गँगस्टर आबू खानला अटक केली होती. पोलीस आबू खानची गेल्या आठवड्याभरापासून चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या कबुलीजबाबात लतीफ शेख यांचंदेखील नाव समोर आलं होतं. आबू खानने केलेल्या गुन्ह्यांमध्ये लतीफ शेख यांचा देखील समावेश होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली होती. त्यामुळे पोलिसांनी लतीफ शेख यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीनंतर लतीफ शेख यांना सोडण्यात आलं होतं. पण घरी गेल्यानंतर रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
लतीफ शेख यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना जबाबदार धरलं आहे. पोलिसांनी पोलीस कोठडीत लतीफ शेख यांची चौकशी करताना त्यांना प्रचंड मारहाण केली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा दावा मृतक लतीफ शेख यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पण लतीफ यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्यांच्या मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यानेच झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment