Friday, July 7, 2023

आज पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट ; हवामान विभागाचा अंदाज ;

वेध माझा ऑनलाईन। महाराष्ट्रातही काही भागात चांगला पाऊस पडत आहे. मात्र, अद्याप अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. हवा तेवढा पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तसेच कोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान विभागानं आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

राज्यातील या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट  जारी करण्यात आला आहे. 


No comments:

Post a Comment