वेध माझा ऑनलाइन। राष्ट्रवादी पक्षाबद्दलची सर्वात मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. या याचिकेची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे.
जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आता तातडीने सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज आठवड्यातील शेवटचा दिवस आहे. पुढचे दोन दिवस कोर्टाला शनिवार-रविवारची सुट्टी असणार आहे. पण त्यानंतर सोमवारी कोर्टाचं नियमित कामकाज सुरु होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून सोमवारच्या याचिकांची यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेचा समावेश करण्यात आलाय.
याचिकेत नेमकं काय म्हटलंय?
जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या सोमवारी 9 ऑक्टोबरला सुनावणी पार पडेल. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं असेल. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांना राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांनी पाठिंबा दिला होता. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय पक्षाच्या विरोधात आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.
जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेच्या प्रकरणी याचिका दाखल करुन दोन महिने झाले तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यावर आता येत्या सोमवारी सुनावणी होईल. त्यामुळे सोमवारी सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना काही आदेश देतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शिवसेना सारख्याच घडामोडी घडताना दिसत आहेत.
No comments:
Post a Comment