देशात नुकतेच काही राजकीय पक्षांनी मतदारांची दुबार नोंदणी झाल्याचा आक्षेप नोंदविला आहे. या अनुषंगाने २६०-कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार या नात्याने, आम्ही निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीचे अवलोकन केले असता, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकानेच चक्क दुबार मतदार नोंदणी केल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे. या स्वीय सहाय्यकाने केवळ स्वत:चेच नाही; आपल्या पत्नीचे व भावाचे नावदेखील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात दोन-दोन ठिकाणी नोंदविल्याचे दिसून आले आहे. बोगस मतदान करण्यासाठीच आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी हे कृत्य केल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. याबाबत चौकशी होऊन गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी सैदपूरचे भाजपचे नेते मोहनराव जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
मोहनराव जाधव यांनी मांडलेले मुद्दे...
वाठार व कराड केंद्रावर दोन्ही ठिकाणी नोंद
मोहनराव जाधव म्हणाले...२६०-कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्रमांक २९५ मध्ये वाठार मतदान केंद्रावर १३५९ क्रमांकाच्या ठिकाणी गजानन शंकर आवळकर (वय ६३) या मतदाराचे नाव नमूद असल्याचे दिसून येते. तसेच १३५८ क्रमांकाच्या ठिकाणी संगीता गजानन आवळकर (वय ५६); तर ७१७ क्रमांकाच्या ठिकाणी जयप्रकाश शंकर आवळकर (वय ४९) यांचे नाव नमूद असल्याचे दिसून येते.
याच मतदारसंघातील यादी भाग क्रमांक १२७ मध्ये कराड शहर मतदान केंद्रावरसुद्धा, वर नमूद केलेले मतदार अनुक्रमे गजानन शंकर आवळकर (वय ६२) यांचे नाव ५७३ व्या क्रमांकावर, संगीता गजानन आवळकर (वय ५४) यांचे नाव ५७४ व्या क्रमांकावर; तर जयप्रकाश शंकर आवळकर (वय ४८) या मतदारांचे नाव दुबार नोंद असल्याचे स्पष्टपणे दिसून येते
बोगस मतदानासाठीच दुबार नोंदणी
जाधव पुढे म्हणाले...या तिन्ही मतदारांनी बोगस मतदान करण्याच्या उद्देशानेच आपली नावे दोन्ही ठिकाणी जाणीवपूर्वक नोंदविल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे. कारण वर दुबार नोंद असलेले गजानन शंकर आवळकर ही सामान्य व्यक्ती नसून, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्वीय सहाय्यक आहे. त्यांनी स्वत:बरोबरच पत्नीचे आणि भावाचे नाव वाठार व कराड अशा दोन्ही मतदान केंद्रावर ठेऊन, बोगस मतदान केल्याची दाट शक्यता आम्हाला वाटते.
वास्तविक याबाबत मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर विहित प्रक्रियेनुसार आक्षेप नोंदविण्यात आला होता. पण त्यावेळी श्री. आवळकर यांनी आपल्या पदाचा आणि माजी मुख्यमंत्री व तत्कालीन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या वरदहस्ताचा वापर करत, स्वत:ची व कुटुंबीयांची दुबार नोंद रद्द होऊ नये, यासाठी मोठा खटाटोप केला. या प्रकरणात त्यांच्या या कृत्यामुळे एका बी.एल.ओ. प्रतिनिधीला घाबरुन राजीनामा द्यावा लागल्याचे प्रकरण सर्वश्रुत आहे. शिवाय ऐन निवडणुकीदिवशी त्यांनी दोन्ही केंद्रावर मतदान करण्याचा धक्कादायक प्रकारही केला असल्याचे, अनेकांनी स्वत: पाहिले आहे
बोगस कागदपत्रांचा वापर?
या मतदार यादीत वाठार आणि कराड येथे या तिन्ही मतदारांनी नोंदविलेल्या नावावेळी जे वय नमूद केले आहे, त्यातदेखील स्पष्ट तफावत दिसून येत आहे. त्यामुळे ही नावे नोंदविताना गजानन आवळकर यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी बोगस आधार कार्ड अथवा तत्सम कागदपत्रांचा आधार घेतला का?, याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याच गजानन आवळकर यांनी मतदार यादीबाबत, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्या व्यक्तीने स्वत:च घोळ केला आहे, तो कुठल्या तोंडाने उच्च न्यायालयात गेला आहे? हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.
गुन्हे दाखल करुन, सखोल चौकशी करा!
राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वीय सहाय्यकाचे नाव अशाप्रकारे बोगस मतदानासाठी दोन्ही ठिकाणच्या यादीत नोंदविले जाणे, हे धक्कादायक आहे. स्वत: स्वीय सहाय्यकच अशाप्रकारे नोंदणी करत असेल, तर आवळकर यांनी आपल्या या राजकीय बळाचा वापर करत संपूर्ण कराड दक्षिण मतदारसंघात अशाप्रकारे आणखी किती जणांची दुबार नोंदणी केली आहे?, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. त्यामुळे बोगस कागदपत्रे वापरुन, खोट्या वयाची नोंद करुन दुबार मतदार नोंदणी केल्याबद्दल या मतदारांवर गुन्हे दाखल करुन, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेद्वारे करत आहोत असेही ते म्हणाले
पृथ्वीराज चव्हाण यांची मूकसंमती आहे का?
राज्याचे मुख्यमंत्रीपद, केंद्रात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रीपद, खासदार, आमदारपद भूषविलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या जबाबदार नेत्याचा स्वीय सहाय्यक अशी अनागोंदी करत असतानाही, त्याची कल्पना त्यांना नसेल यावर आमचा विश्वास बसत नाही. किंबहुना आपल्या स्वीय सहाय्यकाच्या या कृत्याला त्यांची मूकसंमतीच होती का? अशा प्रश्नही आम्हाला पडला आहे.
विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नेमलेल्या मतदार सत्यशोधन समितीचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मतदार यादीत काही घोळ झाला आहे का? याची पडताळणी केली जात असल्याचे समजते. मग या पडताळणीत त्यांना आपल्या स्वीय सहाय्यकानेच केलेला घोळ का बरे दिसला नसेल? की दिसूनही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला आहे का, असा प्रश्नही आम्हाला या निमित्ताने त्यांना विचारावासा वाटतो.
लोकशाही तत्वांना हरताळ फासणारे कृत्य
मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीच्या स्वीय सहाय्यकानेच अशाप्रकारे दुबार मतदार नोंदणी करणे आणि ती कायम ठेवणे, हे कृत्य लोकशाही तत्वांना हरताळ फासणारे आहे. त्यामुळे लोकशाही तत्वांच्या संरक्षणासाठी अशाप्रकारे दुबार नोंदणी करणाऱ्या गजानन आवळकर यांच्यासह अन्य दोघांवर प्रशासनाने ताबडतोब गुन्हा दाखल करुन, त्यांची सखोल चौकशी करावी. जेणेकरुन या लोकांनी मतदारसंघात अन्य ठिकाणी अशा दुबार मतदारनोंदी कायम ठेऊन, जाणीवपूर्वक लबाडी केली आहे का?, याचाही उलगडा होऊ शकेल. वरील मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणीही मोहनराव जाधव यांनी यावेळी केली
No comments:
Post a Comment