पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अत्याधुनिक दुहेरी कक्ष (ड्युएल चेंबर) लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपणाची गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, साधारणपणे १७ लाख रुपयांपर्यंत खर्चाची ही शस्त्रक्रिया संबंधित रुग्णावर माजी सैनिक अंशदान आरोग्य योजना (ई.सी.एच.एस.) अंतर्गत कृष्णा हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत करण्यात आली.
कराड येथील ७१ वर्षीय माजी सैनिक रुग्णाला संपूर्ण हृदय अवरोध म्हणजेच कम्पलीट हार्ट ब्लॉक असल्याने पूर्वीच कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आला होता. पण कालांतराने पेसमेकर बसविण्यात आलेल्या छातीच्या दोन्ही बाजूंना वारंवार संसर्ग होऊ लागल्याने त्याच्यावर उपचाराचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. या संसर्गामुळे रुग्णावर दोनदा पेसमेकरशी संबंधित शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या होत्या. अशा परिस्थितीत पुन्हा पारंपरिक पेसमेकर बसविणे धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने, अत्याधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे होते.
संबंधित रुग्ण कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात तपासणीसाठी दाखल झाला असता, योग्य चाचण्यानंतर त्याच्यावर दुहेरी कक्ष लीडलेस पेसमेकर प्रणालीचा पर्याय निवडण्यात आला. या तंत्रज्ञानामध्ये छातीवर कोणतीही चिरफाड न करता, मांडीतील रक्तवाहिनीतून कॅथेटरच्या सहाय्याने थेट हृदयामध्ये सूक्ष्म उपकरणे बसविली जातात. या ‘ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर’ प्रणालीमध्ये हृदयाच्या वरच्या व खालच्या कक्षात दोन स्वतंत्र उपकरणे बसविण्यात आली. ही उपकरणे वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे परस्पर समन्वय साधून हृदयाची नैसर्गिक गती अबाधित ठेवतात. त्यामुळे पारंपरिक पेसमेकरमधील तारा, छातीवरील शस्त्रक्रिया आणि पेसमेकर पिशवीतील संसर्गाशी संबंधित गुंतागुंत टाळणे शक्य झाले. उपचारानंतर रुग्णात संसर्गाचा धोका कमी झाला असून, कमी वेदनांमध्ये जलद पुनर्वसनास मदत झाली. या रुग्णाला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. यामध्ये डॉ. सोमनाथ, डॉ. प्रशांत पवार, डॉ. रमेश कवडे, कॅथलॅबमधील तांत्रिक कर्मचारी व परिचारिका यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच, ई.सी.एच.एस. योजनेअंतर्गत आवश्यक प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. एस. ए. माशाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले; ज्यामुळे रुग्णावर सुमारे १७ लाखांची ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली.
याबाबत बोलताना कृष्णा हॉस्पिटलचे हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके म्हणाले, लीडलेस पेसमेकर तंत्रज्ञान हे पेसमेकर उपचार क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विशेषतः पेसमेकरशी संबंधित संसर्ग झालेले रुग्ण, रक्तवाहिन्यांमधील अडथळे असलेले रुग्ण, वारंवार पेसमेकर बदलण्याची आवश्यकता असलेले रुग्ण किंवा पारंपरिक पेसमेकरमुळे गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असलेल्या निवडक रुग्णांमध्ये ही पद्धत अधिक सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय ठरू शकते.
‘कृष्णा’ : प्रगत इलेक्ट्रोफिजिओलॉजी सेवांचे महत्वपूर्ण केंद्र
कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्या ११ वर्षांपासून स्वतंत्र इलेक्ट्रोफिजिओलॉजी विभाग कार्यरत असून, हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा येथे उपलब्ध आहेत. या विभागाच्या माध्यमातून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांबरोबरच उत्तर कर्नाटक आणि गोवा येथील रुग्णांनाही सेवा पुरविण्यात येतात. या विभागात इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी, रेडिओफ्रिक्वेन्सी एब्लेशन, आयसीडी प्रत्यारोपण, सीआरटी उपकरणे, अत्याधुनिक पेसमेकर प्रणाली तसेच जटिल हृदय गतीविकारांवरील विविध उपचार परवडणाऱ्या खर्चात उपलब्ध आहेत. सुसज्ज कॅथलॅब, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आणि दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कृष्णा हॉस्पिटलने प्रगत हृदयविकार उपचारांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
No comments:
Post a Comment