वेध माझा ऑनलाईन। टोलदरवाढीवरून राज ठाकरेंनी उपसलेली तलवार म्यान झाली का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण चार दिवसांपूर्वी टोलनाके जाळून टाकण्याची भाषा करणारे तसेच टोल म्हणजे राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज ‘राज्य चालवायचे असले तर रेव्हन्यू लागतो’, अशी मवाळ भूमिका घेतलेली दिसली. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी ‘राज्यातल्या सगळ्या टोलवर चारचाकी तसेच छोट्या गाड्यांना आम्ही मुक्ती दिली’ हे वक्तव्य करण्यामागचे कारण काय होते आणि त्यावरून आक्रमक झालेल्या मनसेने टोलनाक्यांवरील सुविधांचा विषय लावून धरल्याने टोलमुक्त महाराष्ट्राचा मुद्दा बहुधा मागे पडणार असल्याचे दिसते.
मुंबईच्या प्रवेशावरील टोलनाक्यांनी १ ऑक्टोबरपासून दरवाढ केल्यानंतर मनसे आक्रमक झाली. मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी चार दिवस ठाणे टोलनाक्यावर उपोषण केले. त्याची दखल सरकारने न घेतल्याने खुद्द राज ठाकरे ठाण्यात गेले आणि अविनाश जाधव यांना उपोषण सोडायला लावून आपण चार दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे स्पष्ट केले. त्यानंतर राज ठाकरेंनी काल (१२ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. आणि टोलसंदर्भात अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. या चर्चेचा दुसरा अंक आज राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर झाला. मंत्री दादा भुसे यांच्याशी राज ठाकरेंनी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली आणि कालचे मुद्दे विस्तृतपणे मांडले.
इशाऱ्याचे काय झाले?
आता प्रश्न उपस्थित होतोय की, रोड टॅक्स घेता तर टोलवसुली का करता, हा राज ठाकरेंचा मुख्य मुद्दा होता. पेडर रोडच्या नसलेल्या फ्लायओव्हरसाठी टोल वसूल केला जातोय, हाही राज ठाकरेंचा मुद्दा होता. टाेलचा पैसा जातो कुठे? असा सवाल करत चार चाकी गाड्यांकडून सरकारने टोल घेऊ नये, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. आणि जर यावर सरकार अंमलबजावणी करत नसेल तर आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशाराही राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला होता.
पण आजच्या पत्रकार परिषदेत ‘सरकार चालवायला रेव्हेन्य लागतो’, असे वक्तव्य करून राज ठाकरेंनी टोलविरोधी मोहीम मवाळ केल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. बहुतांश टोलनाक्यांसाठी २०२६ पर्यंत करार झाले आहेत. त्यामुळे काही करू शकत नाही, असे राज ठाकरे आज म्हणालेत. हे त्यांना आधीही ठावूक होते तरीही टोलनाके जाळून टाकण्याची भाषा त्यांनी का केली, हा प्रश्न आहेच.
No comments:
Post a Comment