Friday, March 11, 2022

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे भाजप आमदारांकडून अभिनंदन ; राजकीय वर्तुळातील सर्वांच्या भुवया उंचावल्या...

वेध माझा ऑनलाइन - राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपचे नेते आणि आमदार टीका करत आहेत. मात्र त्याच दरम्यान बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी या अर्थ संकल्पाचं स्वागत करत अभिनंदन केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नवी मुंबईतील बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाकरे सरकारच्या अर्थंसकल्पाचं स्वागत केलं आहे. आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या, या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी आज जो अर्थसंकल्प मांडला आहे त्या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करत आहे. नवी मुंबईत गेली 15-20 वर्षे महाराष्ट्र भवानाचा जो विषय प्रलंबित होता तो विषय मी सातत्याने सभागृहात मांडला. अजितदादांनाही मी सांगितलं महाराष्ट्र भवन महाराष्ट्रात होणं किती गरजेचं आहे. त्यानंतर आज अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद महाराष्ट्र भवनासाठी केली आहे आणि त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करते.


महाराष्ट्र भवनासाठी 100 कोटी

राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची तात्पुरत्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून नवी मुंबई येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येईल. याकरिता 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलं.

एमपीएससीसाठी नवी मुंबईत स्वतंत्र भवन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयासाठी सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे स्वतंत्र भवनासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

ऐरोलीत मराठी भाषा संशोधन उपकेंद्र

मराठी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी मुंबईत 100 कोटी रुपये खर्चाचे“ मराठी भाषा भवन” उभारण्यात येईल. येत्या 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या भवनाचे भूमीपूजन करण्याचे नियोजित आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे “मराठी भाषा संशोधन उपकेंद्रा”साठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांनी केली टीका

ठाकरे सरकारच्या या अर्थसंकल्पावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील 22 राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करुन सामान्य माणसांना दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कमी केल्यानंतर तितकाच कर त्या राज्यांनी केला. महाराष्ट्रासारखं पुरोगामी राज्य ज्याची अर्थव्यवस्था अतिशय चांगली आहे आणि आता तर 12 टक्क्यांनी वाढ होणार आहे असं घोषित करण्यात आलं आहे. या राज्यात पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यासाठी फुटकी कवडी सुद्धा देण्यात आलेली नाहीये.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, समृद्धी महामार्गाला विरोध मुख्यमंत्री आणि पवार साहेबांनी केला होता. मुंबईतील मेट्रो असेल, मेट्रो 3 असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, वेगवेगळ्या प्रकल्पाला विरोध करणारं सरकार आता त्याच संदर्भात पुन्हा घोषणा करत आहेत. आज सादर कऱण्यात आलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाला कुठल्याही प्रकारची चालना देऊ शकत नाही. बजेटमध्ये वृत्तपत्रात चौकट यावी इतपत चार बातम्या तयार होऊ शकतात याव्यतिरिक्त कुठलीही दिशा या बजेटला नाही. विशेषत: गेल्या बजेटट्या घोषणा पुन्हा या बजेटमध्ये करायच्या. आमच्या सरकारच्या काळात सुरू असलेल्या घोषणा पुन्हा या बजेटमध्ये सांगायच्या.

No comments:

Post a Comment