Thursday, March 10, 2022

ठाकरे सरकार कधीही पडू शकत ; काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्यानेच केले भाकीत ; अनेकांच्या भुवया उंचावल्या...

वेध माझा ऑनलाइन - महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. हे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून हे सरकार पडेल, असा दावा प्रत्येक महिन्यात करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भाजच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हे सरकार नेमकं कधी पडेल याबाबत तारखाही दिल्या आहेत. पण सरकार अद्याप तरी कोसळलेलं नाही. सरकार पाडण्याबाबत विरोधकांकडून कितीही दावे-प्रतिदावे केले जात असले तरी महाविकास आघाडी सरकारच्या सर्व प्रमुख नेत्यांकडून हे सरकार भक्कमपणे चालू असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास नागरिकांना वेळोवेळी देण्यात आला आहे. विशेषत: या तीनही पक्षांमध्ये अनेकदा कटूता येते, नाराजी नाट्य रंगतं, तरीही हे सरकार स्थिर असल्याचं मंत्र्यांकडून सांगितलं जातं. पण आता काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्यानेच ठाकरे सरकार कधीही पडू शकतं, असं म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कधीही कोसळू शकतं, अशी भीती काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी वर्तवली आहे. कुमार केतकर 'बीबीसी मराठी'च्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील ऑपरेशन लोटस मोहिमेचीदेखील आठवण करुन दिली. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार कधीही पडेल, अशी भीती केतकरांनी यावेळी बोलून दाखवली.

कुमार केतकर नेमकं काय म्हणाले?

"ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच ही भीती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं. भाजप हा अत्यंत साधनशूचिता असणारा पक्ष आहे. कर्नाटकमध्ये काय झालं, मध्यप्रदेशात काय झालं हे पाहिलं की लक्षात येतं. ज्यावेळी तथाकथित लोटस कॅंपेनमध्ये लोक स्वतःच राजीनामा देतात आणि निवडणुकीत बहुमत मिळालेल्या सरकारला जुमानत नाहीत आणि पुन्हा निवडून येतात. हे सर्व कसं रीतसर, घटनात्मक पद्धतीने होतं", असं कुमार केतकर यांनी सांगितलं.

"हे अत्यंत साधनशूचितेनं होतं. त्यांना वाटलं म्हणून ते कर्नाटक सरकारमधून बाहेर पडले, त्यांना वाटलं म्हणून ते मध्यप्रदेश सरकारमधून बाहेर पडले. गोव्यातल्या लोकांनाच असं वाटलं की बाहेर पडावं, कारण भाजप हा साने गुरुजींच्या विचारावर चालणारा पक्ष आहे, हे मला माहीत आहे", असं कुमार केतकर उपहासाने म्हणाले

No comments:

Post a Comment