वेध माझा ऑनलाइन - प्राचीन कराड शहराला मोठा इतिहास आहे. हा इतिहास अजूनही अप्रकाशित असून महेश्वर चव्हाण यांच्यासारखे मोडी अभ्यासक हा इतिहास प्रकाशात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कराडमधील जुनी घराणी तसेच नागरिकांनी आपल्याकडील जुनी मोडीतील कागदपत्रे संशोधनासाठी उपलब्ध करून द्यावीत. इतिहास संशोधन हा जगन्नाथाचा रथ असून त्यास सर्वांचा हातभार लागणे आवश्यक आहे, असे आवाहन दुर्गप्रेमी के. एन. देसाई यांनी केले.
येथील सोमवार पेठेतील श्री उत्तरालक्ष्मी मंदिरात श्री उत्तरालक्ष्मी संस्थानचा इतिहास या विषयावर मोडी अभ्यासक महेश्वर चव्हाण यांनी शोधनिबंधाचे वाचन केले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून देसाई सर बोलत होते. नगरसेवक विनायक पावसकर, सौरभ पाटील, चंद्रहास पुजारी, देवानंद पुजारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
के. एन. देसाई पुढे म्हणाले, इतिहास संशोधनासाठी मोडी लिपीचा अभ्यास असणे आवश्यक आहे. कराडच्या संशोधनाला चालना मिळण्यासाठी येथे मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र कोरोनाच्या लाटेमुळे हे वर्ग थांबले असून हे प्रशिक्षण वर्ग पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून शहराचा ऐतिहासिक ठेवा लोकांसमोर येण्यास मदत होणार आहेत.
शोधनिबंध सादर करताना महेश्वर चव्हाण यांनी चित्रफितीच्या आधारे जुन्या कागदपत्रांची माहिती दिली. श्री उत्तरालक्ष्मीची मूर्ती शाळीग्राममधील असून महिषमर्दिनी रूपातील आहे. या मूर्तीच्या संशोधनासाठी 1654 सालापासूनची पत्रे अभ्यासली आहेत. अफजलखानाच्या वधानंतर कराड परिसर स्वराज्यात सामील झाला. त्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भही उत्तरालक्ष्मी संस्थानच्या संदर्भाने पुढे आला आहे. यापुढील काळातही या संस्थानचे संशोधन होणार आहे. कराड हे ऐतिहासिक शहर आहे. येथील नागरिकांनी सहकार्य केले तर इतर मंदिरे, वास्तूंचा इतिहासही पुढे येईल. माऊली ढवळे, निरंजन तांबे, आशिष गुप्ता, तेजह अर्बुणे, किरण माळी, संकेत फडके, किरण जाधव, जयेश मोरे, वैष्णवी सुर्वे आदी अभ्यासकांचेही सहकार्य लाभत असल्याचे महेश्वर चव्हाण यांनी सांगितले. वैष्णवी सुर्वे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
No comments:
Post a Comment