वेध माझा ऑनलाइन - कर्नाटकमध्ये हिजाब, झटका-हलाल मीटच्या विरोधानंतर आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील मशिदीवर लाऊडस्पीकरवरुन नमाज पठण करण्यावरून राजकारण सुरू झालं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर आता मनसेच्या घाटकोपर कार्यालयात लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा लावली जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडव्याच्या मेळाव्यादरम्यान इशारा देत राज्य सरकारकडून मशिदीवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केली होती.
राज ठाकरेंनी शनिवारी सांगितलं होतं की, मी इशारा देत आहे..जर मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्यात आले नाहीतर त्याच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू. काल गुढीपाडव्यानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.
राज ठाकरे पुढे म्हणाले होते की, माझा प्रार्थनेला विरोध नाही. मी कोणत्या धर्माविरोधातही नाही. मला माझ्या धर्मावर अभिमान आहे. मनसे प्रमुखांनी यावेळी शरद पवारांवरही टीकास्त्र सोडलं. त्यांनी जातीचं राजकारण केल्याचंही ते यावेळी म्हणाले.
यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर संताप व्यक्त केला. तर अनेकांनी त्यांना भाजपची बी टीम असल्याचंही म्हटलं. याशिवाय मनसेचा केवळ एकच आमदार असल्याने त्यावरुन खिल्ली उडवली. शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीने सर्व जातींना एकजूट करण्याचं काम केलं आहे. राज ठाकरेंनी यावर बोलण्यापूर्वी राष्ट्रवादीचा इतिहास वाचायला हवा होता.
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील असे एकच नेते आहेत की जे दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही की, जितक्या गतीने राज ठाकरे (raj thackery) रंग बदलतात' अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला.
No comments:
Post a Comment