वेध माझा ऑनलाइन - कराडच्या वाढीव भागातील भुयारी गटार योजनेसाठी वाखाण भागात पंपिंग स्टेशन क्रमांक सात प्रस्तावित करण्यात आले होते. या स्टेशनसाठी 2012 साली जमीन देणाऱया 35 शेतकऱयांना टीडीआर मिळवून देण्याचा शब्द लोकशाही आघाडीचे तत्कालीन अध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी दिला होता. मात्र पालिका स्तरावर हा विषय जाणूनबुजून मागे ठेवला गेला असताना सुभाषराव पाटील यांनी पाठपुरावा करून या शेतकऱयांना टीडीआर मिळवून दिला. सोमवारी नगरपालिकेत सुभाषराव पाटील हस्ते व मुख्याधिकारी रमाकांत डाके, सौरभ पाटील, अभियंता श्री ढोणे यांच्या उपस्थितीत टीडीआर प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कराड शहराची हद्दवाढ झाल्यानंतर शहराच्या त्रिशंकू भागासाठी शहराप्रमाणेच भुयारी गटार योजना राबविण्याचा निर्णय तत्कालीन सत्ताधारी लोकशाही आघाडीने घेतला होता. यासाठी विविध ठिकाणी पंपिंग स्टेशन प्रस्तावित करण्यात आली होती. वाखाण रस्त्यावर पटेल लोनच्या मागील बाजूस पौडाचा ओढय़ाजवळ पंपिंग स्टेशन क्रमांक सात प्रस्तावित करण्यात आले होते. येथे जमिनी असणाऱया शेतकऱयांबरोबर वाटाघाटी करून त्यांना जमिनीच्या बदल्यात टीडीआर मिळवून देण्याचा शब्द सुभाषराव पाटील यांनी दिला. मंगळवार पेठेतील शिंदे व तांबवेकर कुटुंबातील 35 शेतकऱयांनी सुमारे 32 गुंठे जमीन दिली.
दरम्यानच्या काळात 2016 साली नगरपालिका निवडणूक झाली. नवे सत्ताधारी आले. लोकशाही आघाडी विरोधी बाकावर गेली. त्यानंतरच्या पाच ते सहा वर्षांच्या काळात भुयारी गटर योजनेतील अडथळे दूर करून ही योजना कार्यान्वित करणे गरजेचे होते. टीडीआरचा शब्द दिलेल्या शेतकऱयांना तो मिळवून देणे गरजेचे होते. मात्र हा विषय पुढे गेलाच नाही. यात दप्तर दिरंगाईचा अनुभव शेतकऱयांना येत होता. मात्र सुभाषराव पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. लोकशाही आघाडीचे तत्कालीन गटनेते सौरभ पाटील यांनी याबाबत पालिका सभेत आवाज उठवला होता. सुभाषराव पाटील आणि सौरभ पाटील यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी, नगर रचना विभाग सातारा, भूमि अभिलेख यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्याधिकारी रमाकांत डाके व जयंत बेडेकर यांचे सहकार्य लाभले. अखेर शासनाकडून हा टीडीआर मंजूर झाला आहे.
सोमवारी नगरपालिकेत सुभाषराव पाटील यांच्या हस्ते संबंधित शेतकऱयांना टीडीआर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुमारे दहा वर्षांनी हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल शेतकऱयांनी सुभाषराव पाटील तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह लोकशाही आघाडीचे आभार मानले.
*सर्वप्रथम पी. डी. पाटीलसाहेबांनी पाहिली होती जागा*
सुभाषराव पाटील यावेळी म्हणाले की, पंपिंग स्टेशन क्रमांक सातची जागा सर्वप्रथम स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेबांनी पाहिली होती. नंतरच्या काळात मी वाटाघाटी केल्या. टीडीआर देण्याच्या शब्द दिला. मात्र मध्यंतरीच्या पालिकेतील राजकीय उलथापालथीत याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले. हा प्रश्न मार्गी लागावा, अशी काहींची इच्छा नव्हती. तरीही शेतकऱयांनी संयमाने वाट पाहिली. आम्ही हा प्रश्न मार्गी लावला. तरीही काही उशिर झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत त्यांनी जमिनी दिल्याबद्दल संबंधित शेतकर्यांचे आभार मानले.
*पंपिंग स्टेशन सात वाखाण भागासाठी महत्वाचे*
सद्याच्या रूक्मिणीनगर भागात पंपिंग स्टेशन क्रमांक तीन आहे. या भागात नागरीकरण वाढत असून येथील ड्रेनेज या पंपिंग स्टेशनला जोडले आहे. त्याचा ताणही वाढत आहे. पंपिंग स्टेशन क्रमांक सातची जागा संपूर्ण वाखाण भागात खोलगट आहे. त्यामुळे ही जागा योग्य होती. पंपिंग स्टेशन झाल्यानंतर संपूर्ण वाखाण भागातील ड्रेनेज येथे जोडता येणार आहे. त्यामुळे तीन क्रमांकाच्या पंपिंग स्टेशनचा ताणही कमी होणार आहे. भुयारी गटर योजनाही गतीने साकारणार आहे.
पाच वर्षे प्रश्न ‘जैसे थे' होता
शहराच्या विकासात योगदान देण्याच्या हेतून सुभाषराव पाटील यांनी आम्हा शेतकऱयांकडे शब्द टाकला. त्याचा मान ठेवून आम्ही जमिनी दिल्या. मात्र गेल्या पाच वर्षात टीडीआर मिळवून देण्याच्या विषय ‘जैसे थे' होता. आम्ही अनेकांना भेटलो. मात्र दिरंगाई होत असल्याने पुन्हा सुभाषकाकांना विनंती केली. त्यांनीच पालिकेत नसतानाही पाठपुरावा केला. त्यामुळे आम्हाला टीडीआर मिळाला आहे.
शशांक शिंदे, (शेतकरी)
No comments:
Post a Comment