Saturday, October 14, 2023

जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

वेध माझा ऑनलाईन।  कृष्णा विश्व विद्यापीठातील भूलशास्त्र विभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट कराड शाखेच्यावतीने जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त १५ व १६ ऑक्टोबर २०२३ रोजी कराडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भूलशास्त्र शाखेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. 

वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ज्ञांचे असलेले महत्व अधोरेखित व्हावे, यासाठी दरवर्षी १६ ऑक्टोबर हा दिवस जागतिक भूलशास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठाचा भूलशास्त्र विभाग आणि इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थेलॉजिस्ट कराड शाखेच्यावतीने रविवारी (ता. १५) सायंकाळी ५.३० वाजता दत्त चौक ते विजय दिवस चौक या मार्गावर जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये शहरातील सर्व भूलतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. 

सोमवारी (ता. १६) कृष्णा विश्व विद्यापीठात सकाळी १० वाजता जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त कार्यक्रम घेतला जाणार असून, यावेळी 'प्रत्येक नागरिक एक जीवन रक्षक' या उपक्रमाअंतर्गत अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत करावयाची ‘जीवनसंजीवनी क्रिया’ याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्यावतीने पथनाट्य सादर केले जाणार असल्याची माहिती, कृष्णा विश्व विद्यापीठ भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. विठ्ठल धूळखेड, भूलतज्ज्ञ संघटनेच्या कराड शाखेच्या अध्यक्ष डॉ. नसीमा कणसे व सेक्रेटरी डॉ. श्रद्धा बहुलेकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment