Thursday, August 1, 2024

मलकापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा नागरिकांवर जीवघेणा हल्ला; पंधराजण गंभीर जखमी

वेध माझा ऑनलाइन।
मलकापूर हद्दीतील आगाशिवनगर परिसरातील लाहोटीनगर मध्ये राहणाऱ्या नागरिकांवर आज पिसाळलेल्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. यावेळी कुत्र्याच्या हल्ल्यात तब्बल पंधरा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर हद्दीतील आगाशिवनगर, लाहोटीनगर हद्दीत आज गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही नागरिक आपल्या घरासमोर बसले होते. यावेळी त्याठिकाणी अचानक पिसाळळलेला कुत्रा आला. त्याने नागरिकांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात कुणाचे नाक, कुणाचे हात तर कुणाच्या पायाला चावा घेत कुत्र्याने दहा ते पंधरा जणांना गंभीर जखमी केले.
अचानक कुत्र्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये एकाच गोंधळ उडून गेला आणि त्यांनी परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यापासून सुटका मिळवण्यासाठी धावाधाव सुरु केली. या घटनेची माहिती मनसेचे तालुका प्रमुख दादा शिंगण यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. माणसे कार्यकर्त्यांसह नागरिकांना सोबत घेत पिसाळलेल्या कुत्र्याचा पाठलाग केला.
नागरिकांनाही आरडाओरड केल्यानंतर पिसाळलेला कुत्रा आगाशिवानगर परिसरात पळत सुटल्याने दादा शिंगणसह नागरिकांनी त्याचा पाठलाग केला. आणि त्या कुत्र्यास चचेगाव हद्दीपर्यंत पळवून लावले. यानंतर पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिला आणि पुरुषांना कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी संबंधाची नागरिकांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, मलकापुरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्याच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment