Monday, March 17, 2025

दंगलखोर बाहेरहून आले ! :आधारकार्ड आणि वाहने सापडली

वेध माझा ऑनलाइन।
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. काल रात्री महाल परिसरात प्रचंड दगडफेक झाली होती. या भागात हिंसक जमावाकडून क्रेनसह अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे महल परिसरातील रस्त्यावर मोठ्या दगडांचा खच पडला होता. 

दंगलखोर बाहेरुन आले...!
नागपूरच्या कालच्या हिंसाचारानंतर रात्रभर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ पसरवणाऱ्या आणि घटनास्थळी दंगल भडकवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 65 संशयित दंगलखोरांना नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे
प्राथमिक माहितीनुसार, महाल परिसरातील हिंसाचारात असणारा अनेकजण उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी परिसरातील असल्याचे समजते. काल रात्रीपासून पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत. हिंसाचार झाला त्याठिकाणी पोलिसांना काही वाहनं आणि आयकार्ड सापडली आहेत. पोलीस याठिकाणी आल्यानंतर संबंधित दंगलखोर तरुण आपल्या दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. तसेच पळापळीत काही दंगलखोरांच्या खिशातील आधारकार्ड आणि ओळखपत्रं खाली पडली होती. ही ओळखपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. भालदारपुरा परिसरात हिंसाचाराचा जोर जास्त होता. मात्र, जमावाने आजुबाजूच्या चिटणीस पार्क, हंसापुरी परिसरातही वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक केली. यामध्ये सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

No comments:

Post a Comment