सेवा निवृत्तीनंतर राजकारणात जाणार का ‘या प्रश्नावर उत्तर देताना, “जोपर्यंत माणूस म्हणून मी जिवंत आहे, तोपर्यंत मी लोकसेवकच राहीन,” असे ठाम विधान तुकाराम मुंढे यांनी केले. त्यांच्या या उत्तराला उपस्थित कराडकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.कराड नगरपालिकेच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेत ‘तरुणाईशी संवाद’ या विषयावर तुकाराम मुंढे यांचे व्याख्यान झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी कराडकरांच्या मनातील राजकीय प्रवेशाचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित केला.
यावर बोलताना मुंढे म्हणाले, “मी आज लोकसेवक म्हणून काम करतोय. हे काम करताना काही नीतीमूल्ये जपली पाहिजेत. समाजाला पुढे घेऊन जाण्याचे काम केले पाहिजे. त्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे आणि तो पुढेही सुरू राहील. मात्र, मी कोणत्या पक्षात जाणार, निवडणूक लढविणार की नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर काय करणार, याची भविष्यवाणी करण्याची ताकद माझ्या नीतीमत्तेत आणि विचारांत नाही.”
राजकीय प्रवेशाच्या चर्चेवर कोणताही तर्कवितर्क न मांडता मुंढे यांनी लोकसेवेप्रती आपली भूमिका स्पष्ट केली. व्याख्यानावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हेही मंचावर उपस्थित होते. कराडकरांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देत मुंढे यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.
शारदीय व्याख्यानमालेपूर्वी तुकाराम मुंढे यांनी प्रीतिसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला.
मुंढे यांच्या कराड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल्स बंद असल्याचे आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्या गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावर स्मितहास्य करत त्यांनी, “जे नियम पाळतात, त्यांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. ज्या ठिकाणी अनियमितता आणि अस्वच्छता असेल, त्यांच्यावर कारवाई होईल,” अशी स्पष्ट भूमिका मांडली.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कारवाईच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या मुंढे यांच्या या विधानामुळे नियमांचे पालन आणि स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबतच्या विधानामुळेही कराडमधील व्याख्यानमालेत उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.