Thursday, May 13, 2021

महाराष्ट्रात लॉकडॉऊन 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय....

वेध माझा ऑनलाइन
कराड
महाराष्ट्रात लॉकडॉऊन 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधारण गेल्या महिन्याभरापासून लॉकडॉऊन अंतर्गत लागू असलेले कडक निर्बंध आता 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत कायम राहणार आहेत.

राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केलाय. त्यामुळे संचारबंदीसह लागू असलेले सर्व नियम लागू असतील. केवळ अत्यावश्यक सेवा आणि योग्य कारण असल्यास घराबाहेर पडण्याची परवानगी असणार आहे.
सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात काही नवीन नियमांचा समावेश करण्यात आला आहे.
परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला आता आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असणं बंधनकारक असणार आहे. हा रिपोर्ट महाराष्ट्रात येण्याच्या किमान 48 तासातला हवा.
माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये ड्रायव्हरसोबत केवळ एका व्यक्तीलाच प्रवास करण्याची परवानगी असेल.
या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असणं बंधनकारक आहे. हा रिपोर्ट सात दिवसांसाठी वैध असेल.
बाजारपेठांमध्ये गर्दी होत असल्यास स्थानिक प्रशासन ती बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं.
दुधाचा पुरवठा, प्रक्रिया आणि प्रवासाला परवानगी असेल.
एअरपोर्ट आणि बंदारांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेट्रो आणि रेल्वेतून प्रवासाची परवानगी असेल.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला आहे.
अमरावती जिल्ह्यात पुढील सात दिवस कडकडीत बंदचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. किराणा मालाच्या दुकानांसह भाजीपाला, फळ विक्रेत्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. केवळ मेडिकल आणि हॉस्पिटल्स सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.
बुलडाणा जिल्ह्यातही 20 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ठिकठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असल्याचं दिसून येत होतं. यापार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यांतर्गत एसटी वाहतूक सेवाही बंद राहणार आहे.
सांगली जिल्ह्यात 5 मेपासून पुढील आठ दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा लक्षात घेता साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पालकमंत्री उदय सामंत यांनी सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. मेडिकल आणि हॉस्पिटल वगळता सर्व आस्थापनं आणि दुकानं बंद राहणार आहेत. (BBC)

No comments:

Post a Comment