Tuesday, May 25, 2021

कृष्णा निवडणुकीसाठी विद्यमान संचालकांसह 6 अर्ज दाखल

वेध माझा ऑनलाइन
कराड
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर सुमारे १२७ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.


सांगली जिल्ह्यातील कडेगाव पलूस शिराळा आणि वाळवा या चार तालुक्यांचा सातारा जिल्ह्यातील कराड तालुका कार्यक्षेत्र असणारे यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीस मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी सत्ताधारी डॉक्टर सुरेश भोसले गटाकडून विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांनी वडगाव हवेली - दुशेरे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर याच गटातून कुसुर येथील विश्वास आत्माराम शिंदे, विंग येथील  तानाजी पांडुरंग खबाले  आणि  कोडोली येथील  गजानन सुभाष जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी कारखान्याच्या वडगाव हवेली - दुशेरे सर्वाधिक चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

तर अन्य दोन उमेदवारी अर्ज रेठरे हरणाक्ष - बोरगाव आणि रेठरे बुद्रुक - शेणोली या गटातून दाखल करण्यात आले आहेत. वाळवा तालुक्यातील बहे गावचे संतोष भगवान दमाने यांनी तर रेठरे बुद्रुक येथील महेश भास्कर कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे १२७ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment