वेध माझा ऑनलाइन। नाशिकमध्ये मोठा राजकीय गदारोळ बघायला मिळतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि ते थेट सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे देखील भाजपसोबत गेले आहेत. भुजबळ यांची नाशिकमध्ये पक्षात चांगली पकड आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यामुळे नाशिकमध्ये मोठा गदारोळ बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी सुरु आहे.
शरद पवार यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक घ्यायची आहे. पण छगन भुजबळ-अजित पवार गटाने त्यांना राष्ट्रवादी कार्यालयात येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे दोन्ही गट आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक देखील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर तैनात करण्यात आलं आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला जातोय. पण कार्यकर्ते ऐकून घेण्यास तयार नाहीत.
No comments:
Post a Comment