Sunday, August 13, 2023

अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस ; हिंदू संघटनेचे अध्यक्ष गोविंद पाराशर यांची घोषणा ;

वेध माझा ऑनलाईन । एकापाठोपाठ पाच फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्याचीच सर्वत्र चर्चा होत आहे. हा अक्षय कुमारचा सर्वात मोठा चित्रपट असल्याचं म्हटलं जातंय. पहिल्या दिवशी चित्रपटाने १० कोटी व दुसऱ्या दिवशी १५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत असला तरी यातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे.

शाळांमधील लैंगिक शिक्षण या विषयावर आधारित या चित्रपटाने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं दिसत आहे. राष्ट्रीय हिंदू परिषदेने या चित्रपटात भगवान शिव यांच्या दूताची भूमिका करणाऱ्या अक्षय कुमारवर थुंकणाऱ्याला किंवा त्याला थप्पड लगावणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, हिंदू संघटनेचे अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी या बक्षिसाची घोषणा केली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी आग्रा येथे अक्षय कुमारचा पुतळा आणि चित्रपटाचे पोस्टर्स जाळले.

अक्षय कुमारने चित्रपटात भगवान शिव यांच्या दूताची भूमिका केली आहे. यामध्ये तो बूट घालून दिसतो, कचोरी खरेदी करतो आणि घाण पाण्यात आंघोळ करताना दिसतो. पाराशर यांच्या मते, हा चित्रपट देवाची प्रतिमा मलिन करतो. सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

No comments:

Post a Comment