Saturday, June 1, 2024

पुणे अपघात प्रकरण चिघळले ; आता मुलाच्या आईला देखील झाली अटक '


वेध माझा ऑनलाइन ।
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंबाचा पाय आणखी खोलात गेला आहे. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईला म्हणजेच शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवाल याना अटक करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे आधी वडील, मग आजोबा आणि आता आईला अटक झाल्याने अग्रवाल कुटुंबाभोवतीचा फास आवळला जात आहे.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. हे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल या घरी नव्हत्या. पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे आणि आज न्यायालयासमोर शिवानी अग्रवाल यांना हजर करण्यात येईल. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं ते एका महिलेचं होतं. आता ते रक्त त्याची शिवानी अग्रवाल यांचं होतं का? हे आता चौकशीत समोर येईल. आधीच या रक्त बदलाच्या प्रकरणात ससून मधील २ डॉक्टरना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, भरधाव कारच्या धडकेत दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. मात्र आपल्या पोराचा गुन्हा लपवण्याच्या नादात अख्खं कुटुंबच पोलिसांच्या चौकशीत अडकलं आहे. सर्वात आधी मुलाच्या वडिलांना म्हणजे विशाल अगरवाल याना अटक करण्यात आली होती. त्यानंतर चालकाचे अपहरण आणि चालकाला धमकावल्याच्या आरोपाखाली मुलाच्या आजोंबाना म्हणजे सुरेंद्रकुमार अगरवाल याना पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. आता ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. एकूणच काय तर मुलाच्या कारनाम्याचा फटका संपूर्ण अग्रवाल कुटुंबाला बसताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment