Monday, March 17, 2025

दंगलखोर बाहेरहून आले ! :आधारकार्ड आणि वाहने सापडली

वेध माझा ऑनलाइन।
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये सोमवारी रात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. काल रात्री महाल परिसरात प्रचंड दगडफेक झाली होती. या भागात हिंसक जमावाकडून क्रेनसह अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे महल परिसरातील रस्त्यावर मोठ्या दगडांचा खच पडला होता. 

दंगलखोर बाहेरुन आले...!
नागपूरच्या कालच्या हिंसाचारानंतर रात्रभर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ पसरवणाऱ्या आणि घटनास्थळी दंगल भडकवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 65 संशयित दंगलखोरांना नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे
प्राथमिक माहितीनुसार, महाल परिसरातील हिंसाचारात असणारा अनेकजण उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी परिसरातील असल्याचे समजते. काल रात्रीपासून पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत. हिंसाचार झाला त्याठिकाणी पोलिसांना काही वाहनं आणि आयकार्ड सापडली आहेत. पोलीस याठिकाणी आल्यानंतर संबंधित दंगलखोर तरुण आपल्या दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. तसेच पळापळीत काही दंगलखोरांच्या खिशातील आधारकार्ड आणि ओळखपत्रं खाली पडली होती. ही ओळखपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. भालदारपुरा परिसरात हिंसाचाराचा जोर जास्त होता. मात्र, जमावाने आजुबाजूच्या चिटणीस पार्क, हंसापुरी परिसरातही वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक केली. यामध्ये सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागतय : देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली खंत ;

वेध माझा ऑनलाइन।
क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली जात आहे. संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वतः कबर हटवेल, असा इशाही सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे, शासनाकडून सध्या औरंगजेबाच्या कबरीला अधिकच संरक्षण देण्यात आलंय. याप्रकणावरुन राज्यात गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
भिवंडीतील मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी, येथील कार्यक्रमातून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागत असल्याची खंत बोलून दाखवली. मात्र, औरंग्याचं महिमामंडन होऊ देणार नाही, असं वचनही त्यांनी दिलं.

धक्कादायक बातमी ! लाडकी बहीण योजनेचे पैसे दारुवर उडवले; काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन
राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत निर्णयात्मक ठरली. लाडक्या बहि‍णींमुळे राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने प्रस्थापित झाल्यान महायुतीमधील तिन्ही पक्षाचे प्रमुख समाधानी आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेची स्क्रुटीन सुरू करण्यात आली असून फोर व्हिलर असलेल्या कुटुंबातील महिलांची नावे वगळण्यात येत आहेत. आत्तापर्यंत विविध कारणास्तव या योजनेतील 9 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करण्यात आलं आहे. एकीकडे ही योजना महिलांना आर्थिक बळ देत असल्याने योजनेचं कौतुक होत असताना, दुसरीकडे या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशांची मागणीही काही दारुड्या नवऱ्यांकडून महिलांना होत आहे. त्यातून घरगुती कलही निर्माण झाल्याचं पाहायाला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात अशीच एक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.लाडक्या बहिणीचे पत्नीच्या खात्यात आलेले पैसे पतीने दारूवर उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महिलेनं पतीला जाब विचारताच पतीने बायकोवरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना माढा तालुक्यात घडली आहे. पत्नीच्या लाडक्या बहिण योजनेच्या पैशावर पतीने डल्ला मारला. पत्नीच्या बँक खात्यातून परस्परपणे लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढून दारूवर खर्च केले. त्यामुळे, पत्नीने याबाबत जाब विचारताच पतीने पत्नीवर चक्क कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. माढा तालुक्यातील लोणी गावातील ही घटना असून पती आणि सासूवर आरोप करण्यात आले आहेत. 

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले...राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येणार :

वेध माझा ऑनलाइन।
राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे. त्यामुळे, नागरिकांना बांधकामासाठी वाळू सहज उपलब्ध होईल. यासंदर्भात अधिवेशनात आज विधानसभेत चर्चा झाली. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत वाळू न दिल्यास कारवाई करणार का? रेती संदर्भात अनेक अधिकारी हे ध्रुतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे जे लोक गाडी पकडून देतील, त्यांना वाहन बक्षीस देईल का? याबाबत आपण पोर्टल करणार आहात का?, असे अनेक प्रश्न भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विचारले होते. मुनगंटीवारांच्या या प्रश्नांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. पुढील 8 दिवसांत राज्यात वाळू धोणार येणार आहे. त्यानुसार, अर्ज केल्यापासून 15 दिवसांत घरकुलधारकांना वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली आहे.

आजची मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे आदेश;

वेध माझा ऑनलाइन। 
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून आता शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपीची रक्कम देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रक्कमीच द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. राज्य शासनाचा यासंदर्भातला आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणारे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिलाची एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. मात्र, आता न्यायालयाने शासनाचा हा निर्णय रद्द ठरवला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पवार कुटुंबावर शोककळा - सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचे निधन-

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाऊजय भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. 18) दुपारी 12 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. भारती पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या निधनाची माहिती देत शोक व्यक्त केला आहे.

उड्डाणपूल उभारणीच्या कामात सावधानता बाळगाआ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सक्त सूचना

वेध माझा ऑनलाइन।
कराड येथे कोल्हापूर नाक्याजवळ सुरू असलेल्या महामार्ग उड्डाणपुलाचा सेगमेंट बसविताना अचानक निसटल्याने २ कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन उड्डाणपूल उभारणीच्या कामाची पाहणी केली. तसेच उड्डाणपूल उभारणीच्या कामात सावधानता बाळगण्याच्या सक्त सूचना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदार कंपनीला दिल्या.

यावेळी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले, की पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत कराड येथे उड्डाणपूल उभारला जात असून, याठिकाणी १२२३ सेगमेंट बसविले जात आहेत. आत्तापर्यंत १०९० सेगमेंट बसविले गेले असून, फक्त १३३ सेगमेंट बसवायचे राहिले आहेत. अशावेळी शनिवारी (ता. १५) रात्री सेगमेंट बसविताना क्रेनमधील तांत्रिक बिघाडामुळे सेगमेंट अचानक निसटल्याने मोठा आवाज झाला. याठिकाणी काम करणारे मजूर बाजूला   पळून जाताना त्यांना ईजा झाली. या मजुरांवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये, तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उड्डाणपूल उभारणीच्या कामात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदार कंपनीने सावधानता बाळगावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेल्या मुदतीत उड्डाणपूलाचे काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. तसेच उड्डाणपुलाच्या कामाच्या निमित्ताने जो एरिया प्रतिबंधित करण्यात आला आहे, अशा एरियात संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी पायी अथवा वाहनाने जाऊ नये, असे आवाहनही आ. डॉ. भोसले यांनी केले. 

Sunday, March 16, 2025

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या ; राजकारणात खळबळ

वेध माझा ऑनलाइन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील मोगा क्षेत्राचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांना गोळ्या घालून संपवण्यात आलंय. त्यामुळे पंजाबमधील शिवसेनेत खळबळ उडाली आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दु:ख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कर्मयोगी च्या संपादिका सौ मंगलताई लोखंडे कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित ;

वेध माझा ऑनलाइन
दैनिक कर्मयोगी च्या संपादिका सौ मंगलताई लोखंडे यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले आहे
पत्रकारिता क्षेत्रातील बहुमोल व यशस्वी योगदानाबद्दल सौ लोखंडे यांचा हा गौरव करण्यात आला आहे

 येथील शिवाजी शिक्षण संस्था वेणूताई चव्हाण कॉलेज व वेणूताई चव्हाण स्मारक चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने वेणूताई चव्हाण  जन्मशताब्दी निमित्त कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा नुकताच येथील वेणूताई चव्हाण स्मारक येथे नुकताच संपन्न झाला यावेळी सौ लोखंडे याना गौरवण्यात आले 
बारामतीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनंदा पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले माजी आमदार बाळासाहेब पाटील हे अध्यक्षस्थानी होते

सौ मंगलताई लोखंडे यांनी दोन दशकांपूर्वी पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याचे ठरवत एकप्रकारे त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली आणि एकुणच वाढलेल्या भांडवलशाही वातावरणातील पत्रकारिता क्षेत्रात उतरत असताना प्रतिकूल परिस्थितीत सौ लोखंडे व त्यांचे पती नंदकुमार लोखंडे यांनी दैनिक कर्मयोगी ची स्थापना केली कोणतीही पत्रकारितेची पार्शवभूमी नसताना केवळ सामाजिक कार्याची आवड व भान राखून या दाम्पत्यानी ही सुरुवात केली त्यासाठी त्यांना अनेक संघर्षाला व स्पर्धेला सामोरे जावे लागले मात्र तो संघर्ष पार करत कर्मयोगीने गेल्या दोन दशकात जिल्ह्यात अग्रगण्य स्थान मिळवले आणि त्याचमुळे सध्या पत्रकारिता क्षेत्रात सातारा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून कर्मयोगी कार्यरत आहे अनेक सामाजिक आवश्यक ते बदल आपल्या लेखणीच्या माध्यमातून  घडवण्यासाठी कर्मयोगीचे योगदान अतुलनीय आहे संपादिका सौ मंगलताई लोखंडे यांच्या संपादनाची सुस्पष्ट भूमिका यासाठी निर्णायक ठरते  कर्तृत्ववान महिला पुरस्काराने आज सौ लोखंडे याना सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या कर्तृत्वाचाच हा गौरव झाला आहे 
कर्म करत रहा, फळाची अपेक्षा करू नका या कर्मयोगी वृत्तीचाच हा गौरव असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातून व्यक्त होत आहे

Saturday, March 15, 2025

शिवेंद्रसिंहराजे काँग्रेसवर बरसले... म्हणाले...काँग्रेसने छत्रपतीं शिवाजी महाराजांना म्हणाव तेवढं महत्व दिले नाही...

वेध माझा ऑनलाइन।
लोकांना गृहीत धरून आपल्यापुरते काम करायचे ही काँग्रेसची नीती आहे जी समाजाला घातक आहे त्यामुळे भाजप शिवाय राज्यात आणि देशात पर्याय नाही लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे देशाचा अभिमान पंतप्रधान मोदी आहेत असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज व्यक्त केलं
यावेळी काँग्रेसने छत्रपतींना जेवढं महत्व द्यायला पाहिजे तेवढं महत्व दिले नाही....भाजपने मात्र छत्रपतींना योग्य ते महत्व देत गडकिल्याच्या संवर्धनासाठी महत्वाची तरतूद करून सन्मान केला असल्याचेही ते यावेळी म्हणाले...

आज विंग (ता; कराड) जि प गटातील काँग्रेस कार्यकरत्यानी आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षात प्रवेश केला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते

ते पुढे म्हणाले आमदार नसताना अतुल भोसले यांनी कराड दक्षिणेसाठी साडेसातशे कोटी एवढा निधी आणला त्यामुळे मागील पराभवानंतर देखील ते सतत कामात राहिले आणि म्हणून कार्यसाम्राट आमदार म्हणून कराड दक्षिण ने त्यांना 40 हजार मतांनी निवडून दिले आता थांबू नका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अतुल बाबांच्या बरोबर राहून कराड दक्षिण मध्ये
सर्वच ठिकाणी भाजपमय वातावरण तयार करा माथाडी कामगारांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले

अतुलबाबा देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार ...
अतुलबाबा देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार आहेत त्यामुळे आजच्या कार्यक्रमात मला अतुलबाबा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रण देताच मी लग्गेच हो म्हटलो...कारण 25 वर्षे आमदार असून आताच राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे...त्यात मी जर अतुलबाबा यांचे हे आमंत्रण नाकारलं असत...तर माझा 6 महिन्यात कार्यक्रम लागला असता...त्यामुळे मी लग्गेच हो म्हटलो...असे म्हणताच सभेच्या ठिकाणी एकच हशा पिकला...

सातारा जिल्हा भाजप चा बालेकिल्ला...
सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता हा भूतकाळ झाला...मात्र अतुल भोसले यांच्यासह उदयनराजे असतील मनोज घोरपडे असतील जयकुमार गोरे असतील मी स्वतः असेन...आम्ही सर्वांनी मिळून भाजपमय वातावरण केलं आहे त्यासाठी लोकांनी व सर्व कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली आहे हे विसरून चालणार नाही...त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपमय
वातावरण तयार झाले असल्याचेही ते म्हणाले

Wednesday, March 12, 2025

मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या निर्धाराला उदयनराजे भोसले यांचा घरचा आहेर ; काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन
मात्सोद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या निर्धाराला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घरचा आहेर दिला आहे. “
मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. पण, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीत असतो. त्यांनी हिंदू-मुस्लीम असा कधी भेदभाव केला नाही. राणे यांनी जे वक्तव्य केले आहे. त्यावर एवढं म्हणणें कि मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचे आहे त्यांनी खावं, असे खा. उदयनराजे भोसले यांनी म्हटले
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मंत्री नितेश राणेंना असं म्हणायचे असेल की औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालले आहे, ते खोदून काढा. मी तर किती वेळा तरी सांगितलं आहे की, तो आक्रमण करायला आला होता. शिवाजी महाराज आणि आपले पूर्वज नसते तर आपण अजून देखील गुलामगिरीत असतो, हे विसरू नका. त्याचा अर्थ तसा काढू नका, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे

अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला / बातमी...

वेध माझा ऑनलाइन
धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ गोरेगावमधील मोतीलाल पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला आहे. 143 एकरवर असलेल्या या प्रकल्पासाठी अदानी समूहाने सर्वाधिक 36 हजार कोटींची बोली लावली आहे.
या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या 13.29 टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर 3 लाख 83 हजार चौरस मीटर क्षेत्रावर घरे बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते. त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजने 13.78 टक्के अर्थात 3 लाख 97 हजार 100 चौ. मीटर जागेवर म्हाडास घरे बांधून देण्याची तयारी दर्शविली.
या प्रकल्पाच्या निविदेतील अटीनुसार एकूण क्षेत्राच्या 13.29 टक्के क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर 3 लाख 83 हजार चौरस मीटर क्षेत्रावर घरे बांधून देणाऱ्या कंपनीस कंत्राट बहाल केले जाणार होते. त्यानुसार अदानी प्रॉपर्टीजने 13.78 टक्के अर्थात 3 लाख 97 हजार 100 चौ. मीटर जागेवर म्हाडास घरे बांधून देण्याची तयारी दर्शविली.या पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून अदानी समूहाला विक्रीसाठी 18 लाख 80 हजार चौ. मीटर क्षेत्र उपलब्ध होईल.


मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी,

वेध माझा ऑनलाइन
 मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी असेही पंकजा मुंडे एका मुलाखतीत म्हटल्या आहेत

12 डिसेंबरला मी मस्साजोगला देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यास निघाले असता अर्ध्या रस्त्यात असतानाच धनंजय देशमुखांना आमच्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला. ते म्हणाले की, आमच्या भावाला तुम्ही न्याय द्या. आज तुम्ही आलात आणि तुमच्याशी कोणी चुकीचे वर्तन केले, तर आम्हाला आवडणार नाही. त्यामुळे मी मागे फिरले, असा खुलासाही पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.
मागच्या तीन वर्षे राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यावेळी धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि सुरेश धस आमदार होते. त्यावेळी देखील वाल्मिक कराड काम करत होता. त्याच्या विषयीची एकही तक्रार सुरेश धस यांनी या तिघांकडे का केली नाही?, असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला
मी भाजपची राष्ट्रीय नेता असूनही धस थेट आरोप कसे करतात?, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धस यांना समज द्यावी, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली आहे.
सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट गपचूप का घेतली याचे उत्तर सुरेश धस यांनी द्यावे, अशंही पंकजा मुंडे या मुलाखतीमध्ये म्हणाल्या.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी होत आहे. 


लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का... आमदार रोहित पवार, वरुण सरदेसाई यांचा सवाल /

वेध माझा ऑनलाइन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? याच अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार का असा सवाल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंना केला...यावर आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही असं म्हटलं. 

आमदार रोहित पवार यांनी अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यांचं मानधन दिलं नसल्याचं म्हटलं. याशिवाय नमो शेतकरी कृषी सन्मान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळी ठेवावी. याशिवाय 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये कधी करणार का याचं पॉइंटेड उत्तर द्या, असं रोहित पवार म्हणाले.  तुम्हाला कृषी योजनेतील लाभार्थ्यांची संख्या माहीत असतानाही तुम्ही त्यांना निवडणूक काळात पैसे दिले मात्र आता त्यांना देत नाही याचा अर्थ निवडणूक साठी त्याचा वापर केला का, असा सवाल रोहित पवार यांनी केला. 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 26 जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांना इन्सेटिव्ह देण्याच्या संदर्भात प्रक्रिया सुरु आहे, असं म्हटलं. ⁠नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळतात. ⁠लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय पाहिला तर त्यात नमूद केलं आहे की 1500 पेक्षा जास्त लाभ घेता येणार नाही . त्यामुळे त्यांना वरचे 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून देत आहे. ⁠जो आकडा कमी झाला तो विभागाने दिला नाही.  ⁠तर मिडीयाने हा आकडा आणला आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

सैफ अली खानवर उपचार झालेल्या रुग्णालयात सुरू आहेत काळ्या जादूचे प्रयोग ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरावर 16 जानेवारी 2025 मध्ये हल्ला झाला. अचानक एक व्यक्ती अभिनेत्याच्या घरात घुसला. मुलांना आणि घरातील महिलांना वाचवण्यासाठी सैफ अली खान आणि हल्लेखोरामध्ये हाणामारी झाली. तेव्हा अभिनेता गंभीर जखमी झाला. तेव्हा अभिनेत्याला रात्र तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या रुग्णालयात अभिनेत्याला दाखल करण्यात आलं, त्या रुग्णालयाबाबत धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. रुग्णालयात काळी जादू होत असल्याची माहिती समोर येत आहे. लिलावती रुग्णालयात अभिनेत्याला दाखल करण्यात आलं होतं.
लिलावती रुग्णालयाचे ट्रस्टी प्रशांत मेहता यांनी दावा केला की, माजी ट्रस्टींनी रुग्णालय परिसरात नव्या ट्रस्टी बोर्ड विरोधात काळी जादू केली. आता परमबीर सिंग, जे लीलावती हॉस्पिटल ट्रस्टचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी प्रशांत बसलेल्या खोलीत काळी जादू केल्याचं त्याने उघड केलंय.

फ्री प्रेस जर्नलमधील वृत्तानुसार, प्रशांत यांच्या कार्यालयाच्या जमिनीखाली आठ कलश आढळून आले ज्यात मानवी केस, कवटी, हाडे आणि तांदूळ होते… असे परमबीर यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साक्षीदारांच्या उपस्थितीत व्हिडीओग्राफी करताना पूर्ण खबरदारी घेत संबंधित जागा खोदण्यात आली.
खोदल्यानंतर जमिनीतून आठ कलश सापडले आहेत. ज्यात काही मानवी अवशेष, केस आणि हाडे होती. अशा वस्तू काळ्या जादूसाठी वापरल्या जात असल्याचं आढळून आलं आहे. रिपोर्टनुसार, रुग्णालयाचे माजी ट्रस्टी आणि अन्य संबंधीत व्यक्तींना 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप नव्या ट्रस्टने केलाय.

याप्रकरणी वांद्रे पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्र कायद्यान्वये काळी जादू आणि दुष्कृत्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला.

‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ ; जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या ;

वेध माझा ऑनलाइन।
शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी मुंबईत आंदोलन झाले. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. त्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचा समावेश होता. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना खळबळजनक विधान केले. ते म्हणाले, ‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका,’ जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्या वक्तव्याचा अर्थ काय, त्यांचा रोख कोणाकडे यासंदर्भात स्पष्टपणे काहीच जयंत पाटील भाषणात बोलले नाही. मात्र, यावेळी राजू शेट्टी यांनी आपले ऐकले असते तर ते खासदार राहिले असते, असे वक्तव्य केले.लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाहीत. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते. , असे  जयंत पाटील यांनी म्हटले.

पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी जाहीरपणे बोलल्या, काय म्हणाल्या?

वेध माझा ऑनलाइन
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील अंतर्गत राजकारण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी पक्षातील नेतेच आमने-सामने आले आहेत. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. आता आमदार पंकजा मुंडे प्रथमच सुरेश धस यांच्याविषयी जाहीरपणे बोलल्या आहेत.

“वृत्तपत्रातील एका पत्रकाराने माझी मुलाखत घेतली. त्यांनी मला जे प्रश्न विचारले, त्यावर मी त्यांना सांगितलं, मी यावर उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्याने उत्तर देण्याचा प्रश्नच येत नाही” असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज द्यावी, असं तुम्ही बोललात का? त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. “ते माझ नाव घेऊन जी चर्चा करतायत, त्यावर मी माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. ज्या विषयाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं, टिप्पणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित नाही. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहूच नये, म्हणून मी चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केलीय की, त्यांना समज द्यावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
विधान सभेला तुम्ही पक्षविरोधी भूमिका घेतली असा त्यांचा आरोप आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा . या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते, ते अपक्ष उभे राहिले. मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे” “त्यांनी असा आरोप करायला नको होता. प्रचार करताना त्यांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे निकाल लागल्यावर असे आरोप करणं, जो व्यक्ती 75 हजार मतांनी निवडून आलाय, काम केलं नाही, तर कसं शक्य होईल याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं” असं पंकजा मुंडे म्हणाल्या

कराडात स्व चव्हाणसाहेबांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन ;

वेध माझा ऑनलाइन
दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 112 वी जयंती असून त्यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी उपस्थित राहून अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजितदादा कराडला येणार असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित मानले जात होते. दरम्यान, समाधीस्थळी अजितदादांच्या गटासोबत खासदार शरद पवार गटातील नेते मंडळी देखील एकत्रित आल्याचे पहायला मिळाले. खासदार शरद पवार यांच्या गटातील नेते माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी देखील उपस्थित राहत याठिकाणी अभिवादन केले. 

कराड येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजप आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज आदींनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपस्थित राहून अभिवादन केले. 
यावेळी शरद पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित दिसले


Thursday, March 6, 2025

शेवटच्या दिवशी एकूण 157 अर्ज दाखल ; सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक अपडेट ;

वेध माझा ऑनलाईन –  सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी  एकूण 157 अर्ज पत्र दाखल झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर 234 उमेदवारांचे एकूण 251 उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.
गट /मतदार संघ निहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे- गट क्रमांक 1 – कराड मधून एकूण 14 उमेदवारांचे 18 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. गट क्रमांक 2- तळबीड 32 उमेदवारांचे 34 नामनिर्देशन पत्र दाखल, गट क्रमांक 3- उंब्रज 30 उमेदवारांचे 31 नामनिर्देशन पत्र दाखल, गट क्रमांक 4– कोपर्डे हवेली 46 उमेदवारांचे 49 नामनिर्देशन पत्र दाखल, गट क्रमांक 5- मसूर 40 उमेदवारांचे 42 नामनिर्देशन पत्र दाखल. गट क्रमांक 6- वाठार किरोली  28 उमेदवारांचे 33 नामनिर्देशन पत्र दाखल.अ. जा. /अ. ज. राखीव – 9 उमेदवारांचे 9 नामनिर्देशन पत्र दाखल. महिला राखीव – 14 उमेदवारांचे 14 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
इ.मा.व. राखीव मधून 11 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. वि. जा. /भ.ज./वि.मा.वर्ग राखीव मधून 10 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. त्यामुळे पाच दिवसांत 234 उमेदवारांचे 251 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक संजयकुमार सुद्रिक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक राहूल देशमुख, संजय जाधव, उपनिबंधक अपर्णा यादव काम पहात आहेत.


Tuesday, March 4, 2025

जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान ; नवी दिल्ली येथे झाला सन्मान ;

वेध माझा ऑनलाइन
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन, उच्च दर्जाची साखर निर्मिती करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत, दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेकडून ‘जयवंत शुगर्स’ला राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘जयवंत शुगर्स’ला मिळालेला हा १७ वा पुरस्कार असून, या सन्मानामुळे जयवंत शुगर्सच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जयवंत शुगर्स’ने नेहमीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करत, साखर उद्योग क्षेत्रात मोलाची कामगिरी बजाविली आहे. ‘जयवंत शुगर्स’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साखरेच्या उत्पादनातील वाढ, अन्य उपपदार्थांची निर्मिती व वाढत्या साखर उताऱ्यात सातत्य राखून, साखर उद्योगात उत्तुंग भरारी घेत एक आदर्श निर्माण केला आहे. कारखान्याच्या या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेत, राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथड्स ऑफ शुगर अ‍ॅनालिसिस’च्यावतीने भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात, अध्यक्ष डॉ. मार्टिजन लीजडेकर्स, जनरल सेक्रेटरी डॉ. डायर्क मार्टिन व असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय अवस्थी यांच्या हस्ते जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासमवेत कारखान्याचे चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाला वसंतदादा शुगर्स इन्स्टिटयूटचे डायरेक्टर जनरल संभाजीराव कडू-पाटील, मार्क लॅबच्या डॉ. वसुधा केसकर, डॉ. एस. एस. निंबाळकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय किर्तीचे तंत्रज्ञ, तसेच भारतातील साखर उद्योगातील मान्यवर उपस्थित होते. 

या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले, मार्गदर्शक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, श्री. विनायक भोसले यांनी ‘जयवंत शुगर्स’चे सर्व सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार अशा सर्वांचे अभिनंदन केले आहे. 
 

Monday, March 3, 2025

अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा : राज्याच्या राजकारणात खळबळ

वेध माझा ऑनलाईन

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडालीय. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या बातमीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्टी दिली आहे.
दरम्यान सोमवारी (3 मार्च) रात्री संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोंडींना वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच 'देवगिरी' या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दीड तास या सर्वांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले.