Friday, December 3, 2021

आजही होणार हलका पाऊस, पावसाळी वातावरण कधी संपणार? आयएमडी ची माहिती...

वेध माझा ऑनलाइन
कराड
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला अवकाळी पाऊस  थांबण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि कोकण किनारपट्टीवरील चक्रवातामुळे राज्यात सध्या पाऊस हजेरी लावतो आहे. मात्र, कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असल्याने रविवारपासून पावसाळी वातावरण दूर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.

आजही हलक्या पावसाची शक्यता

शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. शनिवारीही या विभागांत हलक्या पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी सकाळी आणि रात्री धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

रविवारपासून पावसाळी वातावरण दूर होणार

आता अरबी समुद्रातील स्थिती निवळत आहे. त्याचप्रमाणे कुठेही नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही. त्यामुळे रविवापर्यंत राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण दूर होऊन कोरडे हवामान निर्माण होण्याचा अंदाज आहे.
सध्या ढगाळ हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट झाल्याने दिवसाचा गारवा कायम आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र सरासरीपेक्षा अधिक आहे.
5 डिसेंबरपासून हवामान कोरडे झाल्यानंतर दिवसाचे कमाल तापमान सामान्य स्थितीत येऊन रात्रीच्या किमान तापमानात घट होईल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

No comments:

Post a Comment