वेध माझा ऑनलाइन - मनसे नेते वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील इतर पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील सुरु असलेले अंतर्गत वाद हे याआधी अनेकदा उघडपणे समोर आले आहेत. त्यामुळे वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देतील, अशा विविध चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर या चर्चांना आणखी खतपाणी घालणारी एक बातमी आता समोर आली आहे. पुण्यात शिवसेना नेते संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली आहे.
संजय राऊत आणि वसंत मोरे यांची पुण्यात एका लग्नात भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या कामांचं कौतुक केलं आहे. याशिवाय राऊतांनी मोरे यांना तात्या म्हणून हाक मारली. त्यामुळे दोघांमध्ये एकमेकांप्रती आपुलकी जाणवली. काही दिवसांपूर्वी मनसेची ठाण्यात उत्तरसभा झाली होती. त्यावेळी वसंत मोरे यांनीदेखील भाषण केलं होतं. ते भाषण संजय राऊतांनीदेखील ऐकलं होतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी मोरेंचा निरोप घेत असताना पुन्हा भेटू, असं विधान केलं. त्यामुळे वसंत मोरे यांना राऊतांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी ऑफर दिली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
No comments:
Post a Comment