वेध माझा ऑनलाइन - येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा 'आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार - २०२२', आंतराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती, प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी, , विश्वस्त अशोक पांडुरंग पाटील, अॅड. मानसिंगराव पाटील, राजेंद्र वसंतराव माने, दिलीपभाऊ चव्हाण, डॉ. विजयकुमार साळुंखे, सौ. रेश्मा कोरे, सौ. शोभा पाटील, संयोजन समिती सदस्य प्रा. एस. ए. डांगे, प्रा. रामभाऊ कणसे, मुकुंदराव कुलकर्णी, ए.एन.मुल्ला, संभाजी पाटील, प्रा. एस. व्ही. जोशी, अबुबकर सुतार, प्रकाश पवार व सुहेल बारस्कर यांची उपस्थिती होती.
डॉ. अशोकराव गुजर म्हणाले, प्रतिष्ठानने २०११ पासून महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केलेल्या विभूतिंना, 'आदरणीय पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने' गौरविण्याची ठरविले आणि १ जुलै २०११ ला पहिला पुरस्कार थोर शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाहीर करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम रुपये ५१०००/-, मानपत्र व स्मृतिचिन्ह असून, आजअखेर कु. नसीमा हुरजूक, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. ज्येष्ठराज जोशी, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. शा. बं. मुजुमदार, डॉ. अभय बंग, डॉ.जब्बार पटेल व डॉ. रणजित जगताप यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गत २ वर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता. आता, यावर्षी २०२२ चा पुरस्कार प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर करण्यात आला असून, आदरणीय पी. डी. पाटील साहेब यांच्या 'स्मृतिदिनी' १७ सप्टेंबर २०२२ रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे असे डॉ. गुजर यांनी सांगितले.
प्राध्यापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्याविषयी -
प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी तीन दशकांहून अधिक काळ अध्यापन, संशोधन आणि शैक्षणिक प्रशासन या क्षेत्रामध्ये भरीव कार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित असलेले डॉ. कदम हे एम्. एस्. सी., पी. एच्. डी. असून त्यांनी भारती विद्यापीठाच्या पुना कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे जवळपास २५ वर्षे प्राचार्यपद भूषविले. दहा वर्षांहून अधिक काळ भारती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू राहिले आहेत. २००६ ते २०१७ या कालावधीत ते कुलगुरू राहिले व आता कुलपती पदाची धुरा सांभाळीत आहेत. रसायनशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. शिवाजीराव कदम यांनी भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून २५ वर्षांहून अधिक काळ काम पाहिले आहे. ते पूणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ आणि विद्वत सभेचे सदस्य होते. विद्यापीठ अनुदान आयोग व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या भारत सरकारच्या दोन सर्वोच्च संस्थेचे सदस्य म्हणून दोन वेळा त्यांचे नाव नामनिर्देशित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे NAAC म्हणजेच राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी भरीव योगदान दिलेले आहे.
डॉ. कदम यांनी दीर्घकाळ अध्यापन व संशोधन क्षेत्रात व्यतीत केला असून, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, श्रीलंका, जपान, थायलंड व फ्रान्स या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन संशोधनपर शोधनिबंध सादर केले आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे १७५ हून अधिक संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. रसायनशास्त्राच्या अनेक पुस्तकांचे त्यांनी सहलेखन केले असून, अनेक पी.एच्. डी. विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 'औषधनिर्माण शास्त्र' या पहिल्या विद्याशाखेची निर्मिती झाली आहे. या विद्याशाखेचे 'पहिले अधिष्ठाता' म्हणून त्यांनी १५ वर्षे काम पाहिले आहे.
सामाजिक बांधिलकीतून आज डॉ. कदम हे महात्मा गांधी स्मारक निधीचे सदस्य, पांचगणी अनाथ आश्रम व कम्युनिटी अॅण्ड स्पॉन्सरशिप प्रोग्राम चे विश्वस्त, महात्मा गांधी चॅरिटेबल हॉस्पिटल या धर्मदाय दवाखान्याचे व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्राचे गव्हर्निंग बॉडीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. शिवाजीराव कदम यांच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये, आंतरराष्ट्रीय न्यायदिनी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व सरन्यायाधीश यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय कायदा दिन पुरस्कार, सीएमएआय आणि टेमा यांच्याद्वारे १६ वा राष्ट्रीय शैक्षणिक पुरस्कार, बार कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे सुवर्णमहोत्सवी विशेष पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा उच्चशिक्षणातील सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, एस्एफई लाईफटाईम अचिव्हमेंट
अॅवॉर्ड, फार्मसी एज्युकेटर ऑफ डिस्टिंक्शन अॅवॉर्ड जीवनगौरव पुरस्कार, यशवंत जीवनगौरव पुरस्कार, आणि फुले - शाहू - आंबेडकर विचार वेद पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment