स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामध्ये रूग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी उपजिल्हा रूग्णालयात जावून याबाबत तात्काळ जाब विचारला व अधिकार्यांची झाडाझडती घेतली. त्यावर संबधित वैद्यकीय अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे रूग्णांच्या जीवाशी खेळणार्या अधिकार्यांवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही. असा आक्रमक पवित्रा राजेंद्रसिंह यादव यांनी घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित वैद्यकीय अधिकार्यांना तात्काळ पदमुक्त करण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, प्रितम यादव, निशांत ढेकळे, विनोद भोसले, मनोज माळी आदी उपस्थित होते.
दरम्यान, स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामधील वैद्यकीय अधिकार्यांचा मनमानी कारभार, रूग्णालयात असणार्या असुविधा, अस्वच्छता याबाबत राजेंद्रसिंह यादव यांनी पाहणी करून आरोग्य मंत्री यांच्याशी संपर्क साधला असून आरोग्यमंत्री, पालकमंत्र्यांसमवेत याबाबतची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
कराड येथील एका युवकास रविवारी कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे त्याने तात्काळ येथील स्व. वेणूताई चव्हाण रूग्णालयामध्ये उपचारासाठी गेला. त्याठिकाणी त्यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी रेबिज लस देण्याची गरज असल्याचे सांगितले यानुसार त्यांनी वैद्यकीय अधिकारी जडगे यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी रेबिज लस शिल्लक नसल्याचे सांगून उपचारास टाळाटाळ केली असल्याचा आरोप युवकाने केला व याबाबतची तक्रार केली. रेबिज लस कुत्र्याने चावा घेतल्यापासून 24 तासांच्या आत रूग्णाला देणे गरजेचे असतानाही लस दिली गेली नाही. याबाबतची माहिती मिळताच राजेंद्रसिंह यादव यांनी तात्काळ रूग्णालयात धाव घेतली व माहिती घेतली. त्यावेळी डॉ. जडगे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनिला लाळे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला असता रेबिज लस शिल्लक असल्याची माहिती त्यांनी दिली. रूग्णांवर उपचार करण्यात येणारी दिरंगाई व त्याबाबत जाब विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे रूग्णांच्या उपचारात दिरंगाई होत असल्यामुळे यादव यांनी संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. तसेच नगरपालिकेतील एका कर्मचार्यालाही तात्काळ उपचाराची गरज असताना त्यांनाही व्यवस्थित उपचार दिला नसल्याचाही आरोप यादव यांनी केला. त्यामुळे संबंधित डॉ. जडगे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येवून त्यांना जागेवरच पदमुक्त करण्यात आले.
यावेळी राजेंद्रसिंह यादव यांनी रूग्णालयाची पाहणी केली. यावेळी अस्वच्छ पाण्याची टाकी, किचनची दुरावस्था दिसून आली. तसेच प्रसूती झालेल्या मातांना पोषण आहार दिला जात नाही हेही निदर्शनास आले. औषधांची कमतरताही निदर्शनास आली. रूग्णालयातील स्टाफची कमतरता, गार्डचे 6 महिन्यांपासून रखडलेले पगार, एमआयआरची मशिनही उपलब्ध नाही. 100 बेडचे उपजिल्हा रूग्णालय असूनही याठिकाणी असणार्या असुविधांमुळे याबाबत लवकरच पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यासमवेत आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.
राजेंद्रसिंह यादव यांची प्रतिक्रिया :
100 बेड असणारे असे हे मोठे रूग्णालय आहे. कराडसह परिसरातील तालुक्यातील रूग्ण याठिकाणी उपचारासाठी येत असतात. मात्र रूग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. असुविधा आणि अस्वच्छता रूग्णालयात मोठ्या प्रमाणात आहे. वैद्यकीय अधिकार्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत असून रूग्णांच्या जीवाशी खेळणार्या डॉक्टरांबाबत तसेच रूग्णालयातील असुविधेबाबत पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्यासमवेत आढावा बैठक घेणार आहे.
No comments:
Post a Comment