सोमवार पेठ येथील व्यावसायिकास बांधकाम परवाना देण्यासाठी दहा लाख रूपये लाचेची मागणी करत त्यातील पाच लाख रूपयाचा पहिला हप्ता खासगी इसमाच्या सांगणेवरून स्वीकारताना कराड नगरपरिषदेचे तत्कालिन मुख्याधिकारी शंकर खंदारेसह, नगररचना विभागाचे सहाय्यक नगररचनाकार, बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारच्या पथकाने सोमवारी रात्री कारवाई केली.
कराड नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा कराड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफीक कय्यूम शेख (वय 40, रा. कार्वे नाका, कराड), खासगी इसम अजिंक्य अनिल देव अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे कराड शहरातील सोमवार पेठ येथे पार्किंग व पाच मजली इमारतीचे काम प्रास्ताविक आहे. तक्रारदार यांनी इमारत बांधकाम परवानगी मिळणेबाबत 2017 मध्ये नगरपरिषद येथे प्रकरण दिल होते. त्याची मुदतवाढ 2019 पर्यंत घेण्यात आली होती. सदरचे काम सुरू न झाल्याचे पुन्हा 2021 मध्ये सुधारीत परवानगी मिळाली. परंतु दरम्यानच्या काळात नियमावलीत बदल झाल्याने सुधारीत बांधकाम परवाना मिळणेबाबत पुन्हा 2023 मध्ये अर्ज दाखल केला होता. सदरील परवानगी करीता तक्रारदार यांनी सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी खासगी इसम अजिंक्य देव याच्या समवेत तक्रारदार यांना भेटून त्यांचे कामात 2000 स्केअर फूट वाढीव एफएसआय इतकी मिळकत असल्याने बाझार भावाप्रमाणे मिळकत किमत अंदाज 80 लाखापैकी दहा ते बारा टक्के रक्कम म्हणजे 10 लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. अजिंक्य देव याचेकडून प्राप्त झाले फाईलवरून स्वानंद शिरगुप्पे व तौफिक शेख याच्या मदतीने बांधकाम परवाना करीता आवश्यक असले चलन स्वानंद शिरगुप्पे याचे व्हॉटस्ॲप वरून स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर घेऊन मागील तारखेच्या चलनावर आज रोजी सह्या करून पुन्हा स्वानंद शिरगुप्पेच्या मोबाईलवरती परत पाठवून लाच घेण्यास पोषक वातावरण तयार करून लाच मागणीसाठी प्रोत्साहन दिले. तसेच शिरगुप्पे याने अजिंक्य देव याच्या मार्फतीने तक्रारदार यांचेकडे लाच मागणी करून प्रोत्साहन दिले. तसेच तौसिफ शेख याने शिरगुप्पे याचे सांगणेवरून मुख्याधिकारी कार्यमुक्त झाल्यानंतर देखील त्यांच्या नावाचे स्वाक्षरी करीता चलन तयार करून ते पाठीमागील तारखेस जावक करून अजिंक्य देव याचे सांगणेवरून दहा लाख रूपये लाचेच्या मागणीतील त्याचा पहिला हप्ता म्हणून पाच लाख रूपये रक्कम स्वीकारली. अजिंक्य देव याने तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे व स्वानंद शिरगुप्पे यांचे करीता लाचेची मागणी करून शिरगुप्पे याचे सांगणेवरून तक्रारदार यांना वेळोवेळी लाच मागणी करून प्रोत्साहन दिले. या चौघांनी तक्रारदार यांना त्यांच प्रलंबित कामा करीता आपल्या पदाचा गैरवापर करीत लाच मागणी करून, प्रोत्साहन दिल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे, पोलीस निरीक्षक सचिन राऊत, श्रीधर भोसले, पोलीस हवालदार नितीन गोगावले, गणेश ताटे, निलेश राजपुरे, प्रशांत नलावडे, विक्रमसिंह कणसे यांनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे करीत आहेत.
No comments:
Post a Comment